आत्मपरीक्षण २

!! श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ !!

आत्मपरीक्षण-२

Read PDF & Download

मागच्या लेखांत आपण ध्यान नामक प्रक्रियेच्या प्राथमिक माहितीसंबंधी चिंतन केले.

आपण समजून घेतले की आत्मपरीक्षण हे एक साधन आहे. ध्यान नामक प्रक्रियेत हे साधन उपयोगी ठरते.

आातां चिंतन करूया ध्यानाच्या माध्यमातून अंतरंग प्रवेश आणि आत्मपरीक्षण. मनुष्याची विचारप्रक्रिया मी आणि माझं या जाणीवे भोंवतिच फिरते. मी हे केलं. मला हे करायचं आहे. मि हे बोलतो. मी हे बघितलं. या प्रकारच्या संवेदना म्हणजेच जाणीव. मी आणि माझं हा मुख्य संदर्भ आहे. तो सहसा सुटत नाही, जाणीवेत. हीच जागृत अवस्था.

मी आणि माझं या जाणीवेपासून बाजूला व्हायचं. हाच ध्यानाचा उद्देश. कशासाठीं? तर ब्रह्मांडाच्या पातळीवर, आत्मतत्वाच्या पातळीवर काय अस्तित्व आहे ते जाणून घ्यायचं आहे. मी आणि माझं या जाणीवेपासून ते आत्मतत्वापर्यंत जाण्याची प्रक्रिया म्हणजेच ध्यान. तोच ध्यानाचा उद्देश आहे. ध्यानाचा उद्देश देखील तोच. आणी प्रक्रिया देखील तीच आहे. ज्याला प्रकृतीचं कुठल्या ही प्रकारचं बंधन नाही, ते आत्मतत्व. त्याच्याबरोबर एकरूप होऊन त्याची प्रचीती घ्यायची आहे. ह्या प्रयोजनार्थ करायचे प्रयत्न म्हणजे ध्यान.

अंतरंगातील वास्तव

आता जीवात्म्याच्या पातळीवरील वास्तवासंबंधी चिंतन करू. जीवात्म्याने मी आणि माझं ही जाणीव घट्ट धरून ठेवली आहे. या जाणीवे बरोबर आपण निगडित झालो आहोत. ही जाणिव म्हणजेच जिवभाव. जीवभावामुळे स्वत: बद्दल जी ममत्वाची भावना निर्माण होते, त्यालाच अहंकार म्हणतात. तसेच सूक्ष्मदेहावरील अंत:करणचातुष्ट्याचे चार प्रभाग आहेत. (मन;बुध्दी;चित्त आणि अहंकार). एका प्रभागाला देखील अहंकार म्हणतात. त्यामुळे संभ्रम संभवतो. सामान्यत: मनुष्याला जीवभावातून निर्माण होणारा अहंकार ज्ञात नसतो.  मनुष्य समजतो की अंत:करणाच्या अहंकार नामक प्रभागच प्रगतीला अडथळा आहे. हा प्रभागच बंधनाचे कारण आहे. ह्याचाच नाश होणे जरूरीचे आहे. परंतु सूक्ष्मदेहच प्रकृतीजन्य आहे. अंत:करण देखील प्रकृतिचेच अंग आहे. अहंकार नामक प्रभाग देखील प्रकृतिचाच भाग आहे. हे बंधनाचं कारण नाही. जीवभावातून निर्माण होणारा ममत्वरूपी अहंकारच समस्येचं मूळ कारण आहे. बंधनाचे मूळ कारण आहे. हे लक्षांत घेणे महत्वाचे. अन्यथा दिशाभूल होईल. जीवभावाच्या वेष्टणामुळे आत्मतत्व बंदिस्त झाले आहे. जीवभावाचे वेष्टण नाहिसे झाल्याखेरीज आत्मतत्वापर्यंत पोहोंचणे अशक्य आहे. जीवभावातूनच देह म्हणजे मी, देहाचं अस्तित्व म्हणजेच माझं अस्तित्व, देह आहे तरच मी आहे. अन्यथा नाही. अशा देहबुद्धीच्या संवेदना निर्माण होतात. ह्यालाच देहभाव देखील म्हणतात. देहभावाच्या अंतर्गत तीन्ही देह येतात. नुसता स्थूलदेह नव्हे. माझा माझा म्हणत जीवात्म्याने या तीन्ही देहांशी संयोग केला आहे. त्यांना पकडून ठेवले आहे. त्यांना नजर कैदेत ठेवले आहे. जीवात्मा देहावर अपार प्रेम करतो. जिवापाड प्रेम करतो. देहाबद्दल जबरदस्त आपुलकी आहे.ममत्व आहे. देहाबरोबर जीवात्म्याला एकरूप व्हायचं आहे. तसा त्याचा प्रयत्न आहे. पण देहाला जिवात्म्याबद्दल जरा सुध्दा आपुलकी नाही. उलट तिरस्कारच आहे. त्यामुळे धड एकरूपता सिध्द होत नाही आणि जीवात्म्याने कैद केल्याकारणाने फारकत पण होऊ शकत नाही. या प्रेमप्रकरणात त्याने मूळस्वरूपाकडे पाठ फिरवली. परंतु देह हे प्रकृतीचे अपत्य आहे. त्याला प्रकृतीचीच ओढ आहे. प्रकृतीचं स्वरूपाशी कांही देणं घेणं नाही. त्यामुळे देहाला जिवात्म्याशी नाही. हे सगळं एकतर्फी प्रेमप्रकरण आहे. जीवात्मा देह आणि प्रकृती दोघांना आपलं आपलं म्हणत स्वत:चा नायनाट करायच्या विचारात आहे. वेडा झाला आहे. कुर्बानी देण्याच्या विचारांत आहे. मूळ समस्या या एकतर्फी प्रेमाचीच आहे. देहाचा प्रोग्राम ठरलेला आहे. केव्हां जन्मायचं, केव्हां तरूण व्हायचं, केव्हां वृध्द व्हायचं, केव्हां अतिवृध्द व्हायचं, केव्हां मृत्यू, सगळं कांही प्रकृतीच्या नियमानुसार आधिच ठरलेलं आहे. त्याचा जीवात्म्याशी कांहीच संबंध नाही. पण आपल्याला वाटतं. देह शंभर वर्षे जगला पाहिजे. शेवटपर्यंत सुदृढ अवस्थेत राहिला पाहिजे. आपल्या देहाद्वारे सुख उपभोग शेवटपर्यंत भोगता आले पाहिजेत. तसा जीवात्म्याचा आग्रह असतो. परंतु देह त्याच्या ठरलेल्या कार्पामानुसार वागतो. त्याला जिवात्म्याबद्दल कांहीच भावना नसते. जीवात्म्याची धडपड देहाद्वारे विविध भोग उपभोग भोगून सुख मिळवण्यासाठीच आहे. त्याकरिता तो देहासाठी बरंच कायकाय करत असतो. विविध प्रकारचं चवी ढवीचं अन्न भरवतो. पाणी पाजतो. आजारी पडूनये म्हणून औषध पाणी भरवतो. देहाकडून व्यायाम वगैरे करून घेत असतो. देवाची प्रार्थना तपस्या सर्वकांही सुख प्राप्ती साठीच करीत असतो. परमेश्वर देखील खदखदा हसतो. तू कोण आहेस आणी काय करतो आहेस म्हणून त्याच्या मूर्खपणावर हसतोच हसतो. जीवात्म्याचा तसेच देहाचा नियंता परमेश्वरच असल्याने त्याला सर्व माहीती आहे. त्यामुळे त्याला हसू आवरत नाही. मधल्यामधे जीवात्म्याची केविलवाणी परिस्थिती होते. तो परमेश्वरकृपेचा विनियोग देहाच्या माध्यमातून सुख प्राप्ती करण्यासाठी करतो. परमेश्वराचा विनियोग करतो आणि प्रकृतीशी संयोग करू बघतो. जीवात्मा प्रकृतीशी संयोग करण्याचे प्रयत्न करतो पण प्रकृती वियोग करू पाहते. संयोग क्षणभर आहे. आणि वियोग अखंड आहे. वियोगातून प्रकृती संदेश देत असते की, हे तुझं स्थान नाही. तुझं स्थान परमेश्वर आहे. तू माझ्या भनगडीत पडू नकोस. परमेश्वराकडे जा. मी माझ्या ठरलेल्या प्रोग्रॅम प्रमाणेच चालणार. त्याचं संगळं नियंत्रण परमेश्वराकडेच आहे. त्यात बदल होणार नाही. परमेश्वराच्या प्रोग्रॅम प्रमाणे मला तुझ्याबरोबर कांहीं काळ घालवावा लागतो आहे. व्याधी येणं व्याधी जाणं परमेश्वराच्या योजनेनुसारच घडतं. परमेश्वराची योजनाअसेल तरच शरीर उपचारांना साथ देईल. परमेश्वराची इच्छा असेल तर मला तुझ्याबरोबर आणखी कांही दिवस काढावे लागतील. उगाच स्वत:ची शक्ती आणि वेळ वाया दवडू नकोस. परंतु जीवात्म्याला हे कांहींच कळत नाही. उलट तो परमेश्वराकडे मागतो, हा देह माझा आहे. ह्या देहाच्या माध्यमातून मला सुख मिळालंच पाहिजे. ते तू मला दे. ही ध्यानाच्या मागची पार्श्वभूमी. आपल्या अंतरंगातले वास्तव.

प्रयोजन

आपल्याला हे सर्व जाणून घेऊन या भ्रमाचं निरसन करायचं आहे. परमेश्वराच्या दिशेने जायचं आहे. हीच ध्यानाची प्रक्रिया आहे. हाच ध्यानाचा उद्देश आहे.

मनुष्याची हीच सूप्त इच्छा आहे की परमेश्वराचा उपयोग करून देहाचं सुख प्राप्त करावं. त्याला परमेश्वरप्राप्ती करावी असं मनापासून वाटतच नसतं. तोंडाने म्हणतो “श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ”. पण मनांत नकळत काय म्हणतो, सगळं सुख मला दे बाबा. संपत्ती दे मला. प्रकृती काय, दिल्यासारखं करते, पण लगेच काढून घेते. मनुष्याला नाचवते. मोकळेपणे देतच नाही. ह्याला कारण जीवात्म्याचं प्रेम  एकतर्फी आहे. परंतु जीवात्म्याची खरी ओढ परमेश्वरप्राप्ती हीच आहे. बाकी सगळे विचार भ्रमामुळे निर्माण झालेले विक्षेप आहेत. नकारात्मकते कडे झुकलेले विचार आहेत.

ध्यान हे परमेश्वरप्राप्ती सिध्द करण्याचे अतिशय महत्वाचे साधन आहे. टूल आहे. ध्यानाची प्रक्रिया मुख्यत्वेकरून वैचारिक प्रक्रिया आहे. येणारे अडथळे देखील वैचारिकच असतात. बौध्दिक पातळीवर जरी परमेश्वरप्राप्ती करण्याचं ठरवलं, तरी अंतरंगातून मनापासून जीवात्म्याची आसक्ती सुटलेली नसते. त्यामुळे आधीपासूनच्या गोळा केलेल्या विचारमालिकांचा गोंधळ निस्तरतच पुढे जावे लागणार. प्रकृतीची इच्छा जीवात्म्याने तिला सोडून परमेश्वराकडे जावं अशीच असते. जीवात्म्याने गांभीर्याने त्या दिशेने प्रयत्न सुरू केले की प्रकृती देखील सहकार्य करते. बुध्दीला एकदा कळलं, हा सगळा घोळ काय आहे? कसा आहे? कशामुळे होत आहे? की बुध्दी बाहेर पडण्याचा, गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतेच. रस्ता आपणहून शोधते.

समर्थन व ऊर्जा पुरवठा

ह्या सगळ्या विचारांचा आधार काय? आधार आपणच असतो. दुसरा कोणीही आधार नाही. आसक्तीमुळे (भावनेच्या पकडीमुळे) आपणच इंटरेस्ट घेऊन त्यांना चघळत चघळत आधार देत असतो. जीवभाव हाच मुख्य आधार आहे. त्याच्याचमुळे सगळा भवनात्मक गुंता निर्माण झाला.

त्या विचारांना ऊर्जा कोण पुरवतो? पॉवर कोण पुरवतो? हा शक्ती पुरवठ्याचा उपद्व्याप जीवभावच करतो. त्याचाच इंटरेस्ट जास्तीत जास्त असतो. जीवभावच आत्मतत्वाकडच्या ऊर्जा साठ्यातील ऊर्जा उपसून देहयंत्रणेला पुरवतो. अखंड पुरवतो. विचारांना ऊर्जा पुरवतो. ध्यानाला सुरुवात कल्यावर विचार उफाळून वर येण्याचं कारण हेच की, तुम्हीच विचारांना ऊर्जा परवता. विचार मालिका वाढवण्यासाठी जरूर असलेली ऊर्जा तुम्हीच पुरवता. ठरवलंत तर तुम्हीच ऊर्जा पुरवठा बंद सुध्दां करू शकता. दुसरं कोणीच करू शकत नाही. ऊर्जा पुरवठा बंद केल्यावर आधीची शिल्लक राहिलेली ऊर्जा संपेपर्यंत विचार तग धरतात. आणि नंतर विरून जातात.  बॅटरी रिकामी होई पर्यंत खेळणं फिरत राहील व नंतर बंद पडेल.

ऊर्जा पुरवठा बंद करायचा म्हणजे नक्की काय करायचे? विचारांना दिलं जाणारं महत्व कमी करून विचार मालिकांत स्वतः सहभाग न घेता, त्रयस्थाच्या भूमिकेतून विचारांचं फक्त नीरीक्षण करायचं. निरीक्षणाच्या प्रक्रियेद्वारे स्वतःचा सहभाग काढून घ्यायचा. म्हणे ऊर्जापुरवठा बंद होतो. आधीची शिल्लक राहिलेली ऊर्जा संपेपर्यंत त्या विचार मालिकांचं अस्तित्व राहील. त्यानंतर अस्तित्वच विरून जाईल. आपला दृष्टिकोन बदलायचा. प्रवाहात वाहात जाण्या ऐवजीं, प्रवाहातून बाहेर येऊन त्रयस्थासारखं प्रवाहाचं निरीक्षण करायचं. त्याच बरोबर बाहेर पडलेल्या विचार मालिकांच्या संबंधी परत विचार करीत नवीन विचार मालिका सुरू करायच्या नाहीत. हा ध्यानाचा पहिला टप्पा, जो भूतकाळ आणि विचार मालिकांचा जुना साठा साफ करतो.

पुढील टप्पा

पुढचा टप्पा अतिशय महत्वाचा आहे. आपण नीरीक्षणाची प्रक्रिया चालूच ठेवायची. आणखीन खोलवर काय घडत आहे त्याचं नीरीक्षण करायचं. प्रेरणेच्या पातळीवर नीरीक्षण करायचं. जुने विचार विरून गेल्यावर आणखीन खोलात प्रेरणेच्या पातळीवर सहजतेने जाता येईल.

कारणदेहावरील संचित साठा बराच मोठा आहे. त्यापासून निर्माण होणार्‍या प्रेरणा चित्तात येतच असतात.  सगळ्याच प्रेरणा अयोग्य नसतात. धारणेतील ज्ञानसिध्दांताच्या आधारे परीक्षण करीत योग्य अयोग्यचा निर्णय घ्यायचा असतो. नवीन प्रेरणा दिवस रात्र केव्हां ही येतात. प्रेरणा चित्तात आल्या आल्या परीक्षण करून अयोग्य परेरणेचे महत्व कमी करून ऊर्जा पुरवठा बंद करून प्रेरणेचा जोर कमी करणे अगत्याचे असते.

विचारांचे प्रेरणांचे नीरीक्षण परीक्षण करून अयोग्य प्रेरणा वेचून त्या प्रेरणेचा ऊर्जा पुरवठा बंद करणे म्हणजेच आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षणात निरीक्षण आणि परीक्षण दोन्ही येतात.

सावधान

नवीन प्रेरणांमुळे होणारा घोळ सुध्दां स्वत:च निस्तरायचा आहे. सावध राहून प्रेरणांचे सतत नीरीक्षण करणे महत्वाचे. त्यांत शरीर स्थिर असले किंवा रोजचे व्यवहार करीत असले तरीही सतत निरीक्षण करण्याची  संवय जडवून घ्यायची आहे. त्याकरितां प्रयत्नशील राहून वरचेवर दिवसभर विचारांचे निरीक्षण करीत गेल्यास, नीरीक्षण करताना शरीर स्थिर असण्याची आवष्यकता भासणार नाही. परिणामस्वरूप, दिवसा तसेच रात्री, २४ तास निरीक्षण करण्याची संवय लागेल. नियमाने सातत्याने ध्यानाचा सराव केल्यास शरीराच्या सहज अवस्थेत, नीरीक्षणाची संवय लागेल. प्राप्त परिस्थितीच्या निमित्ताने प्रेरणेसंबंधी नव्याने विचार विनिमय होतोच. त्रयस्थाच्या भूमिकेतून नीरीक्षण करीत त्यांचे महत्व कमी करीत त्यातील सहभाग टाळायचा आहे. म्हणजे ऊर्जेच्या अभावी त्या प्रेरणेचा जोर क्षीण होत होत, ती विरून जाईल. विकारांच्या प्रेरणा नेहमी बेसावध क्षणींच गाठतात व कोंडी करतात. गुगली टाकतात. प्रेरणा नजरेतून सटकते व त्याचं काम करते. आपल्या लक्षांत नंतर येतं. कधीही बेसावध, गाफिल राहून चालत नाही. असा हा प्रकार दिवस रात्र करायचा आहे. प्रेरणेच्या मागावर रहायचे आहे. त्यामुळे जीवन जगत असताना अखंड सावध रहाणं अत्यावश्यक आहे. ह्याच प्रक्रियेचा फायदा, जागृत होणारी प्रेरणा योग्य का अयोग्य हे ज्ञानाच्या आधारे ठरवत, अयोग्य प्रेरणेचे महत्व कमी करीत सदाचार सिध्द करण्यासाठी देखील होतो.

ह्याच प्रक्रियेचं यथार्थ वर्णन संत तुकाराम महाराज करतात,

रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन ।

दोषीला उपचार

कारणदेहातून प्रेरणा सूक्ष्मदेहावर चित्तात आणण्याचं काम जीवभावच करतो. त्या कार्याल ऊर्जा पुरवठा जीवभावच करतो. दोषी जीवभावच आहे. विचार प्रक्रियेतील, स्वतःचा सहभाग काढून घेऊन, त्रयस्थाची भूमिका घेऊन, जीवभावाकडे दुर्लक्ष करीत, त्याला बाजूला सारायचा आहे. नीरीक्षणाच्या प्रक्रियेद्वारे हे सगळं हळू हळू साध्य होतं. अशक्यप्राय वाटणारं शक्य होतं. कारणदेहावरून प्रेरणा आणण्याचं काम बंद झालं, तर कारणदेहावरील साठा तिथेच पडून राहील. त्याचा उपद्रव होणार नाही. दोषी कोण आहे ते लक्षांत घ्या. त्यालाच उपचार करायचे आहेत.

प्रकृतीच्या स्वयंचलित प्रक्रिये नुसार घडामोडी होत रहातील. आपण करून त्यात बदल होत नाही. आपण करून त्यात बदल होत नाही. त्या चालूच रहातात. आपण फक्त नीरीक्षण करायचं. त्रयस्थाची भूमिका ठेवायची. म्हणजे स्वतःचा सहभाग घडणार नाही. परिणामस्वरूप कारणदेहाला होणारा ऊर्जापुरवठा बंद पडून प्रेरणा उद्दीपित होण्याचे कार्य बंद पडेल. संचित साठा तसाच पडून राहील.

जीवभाव काल्पनिक आहे. सतत दुर्लक्ष केल्यावर जीवभावपण हळू हळू विरून जाईल. जीवभाव नष्ट झाल्यावर, देह पूर्णपणे प्रकृतीच्या आधीन होईल. आत्मतत्व स्वरूपांत विलीन होईल.

ध्यानाच्या प्रक्रियेसाठी देहत्यागाची अथवा मृत्यूची आवष्यकता नाही. ही संपूर्णपणे वैचारिक प्रक्रिया आहे. समजुतीचा घोळ मिटवण्याचा प्रकार आहे.

स्वास्थ्य म्हणजे स्वस्थानात बसणे . शरीर व आत्मतत्व दोघे आपापल्या स्थानी प्रस्थापित होणे. प्रत्येक तत्वाने त्याच्या त्याच्या स्थानीं प्रस्थापित होणं म्हणजेच ध्यान सिध्द होणं. हा बदल धारणेच्या पातळीवर होतो. ध्यान सिध्द होण्यासाठी धारणा सिध्द होण्याची आवष्यकता आहे. सुयोग्य ज्ञान सिध्द झाल्यावरच ज्याचं त्याच्याकडे दिलं जातं.

पुढील विचार

त्यानंतर देहावरील प्रकृतिची मालकी तुम्ही मान्य केली असली तरी ते भाड्याचे घर आत्मतत्वाने धारण केले आहे. भाड्यापोटी देहाची वेळोवेळी देखभाल करणे , वेळोवेळी अन्न पाणी, औषध जे आवष्यक आहे ते पुरवणे जरूरी आहे. रंगरंगोटी करीत देहाला सजवत देहाला नटवू नका. पण पडणार नाही इतपत देखभाल करणं जरुरी आहे.

देह टिकून राहील व सदैव सुखभोग भोगता येतील अशा आशेवर राहू नका. ही धारणा पक्की झाली पाहिजे. धारणेतूनच ध्यान आहे. धारणा पक्की झाल्यावरच ध्यान सिध्द होईल. ध्यानाच्या प्रक्रियेद्वारेच धारणा सिध्द करायची आहे. दोघं एकमेकावर अवलंबून आहेत. धारणेसहित ध्यान आहे.

देहासक्ती सोडल्याबरोबर, देह प्रकृतीच्या आधीन केल्याबरोबर, प्रकृतीची ऊर्जा देहाला सहज मिळते. ब्रह्मांडाच्या प्रकृतिचा मोठा गिअर देहाच्या छोट्या गिअर बरोबर जोडला जातो. प्राकृतिक ऊर्जा अखंड मिळते.  देह चैतन्यमय होतो. आत्मतत्व या देहाच्या माध्यमातून प्रचंड कार्य करतो. देहाला शीण येत नाही.

देहाला शीण कशामुळे येतो? देहासक्तीमुळे जिवात्मा देहाला पकडूनठेवतो. पण देह सर्व शक्ती निशी सुटून प्रकृतीशी संलग्न होण्याची धडपड करतो. ह्या ओढाताणीमुळे जीवात्म्याला शीण येतो. देहासक्ती सोडली तर देह पूर्णपणे प्रकृतीच्या नियंत्रणात येईल. प्रकृतीची ऊर्जा पूर्ण क्षमतेने मिळून चैतन्यमय होईल. थकवा कधीच जाणवणार नाही.

आजारी पडल्यावर, धयानाच्या प्रक्रियेचा वापर करून देहासक्ती कमी केल्यास त्याचा शरिरिक पातळीवर परिणाम जाणवतोच. सगळ्या व्याधींचं मूळ कारण भवव्याधीच आहे.

निर्धार

ध्यानाच्या प्रक्रियेची व्याप्ती शेवट पर्यंत आहे हे समजून घेतले. प्रक्रिया कशी काम करते ह्यासंबंधी सखोल माहिती आपण घेतली. ह्यापुढे प्रत्यक्ष प्रयोग करा. निर्धाराने करा. ध्यानाचा पुढचा भाग कठीण वाटला तरी स्वामिंच्या पाठिंब्याने सहज साध्य आहे. त्याचा धसका घेऊन टाळाटाळ करू नका. प्रयत्न सोडू नका. पहिला भाग साधल्यावर आपला आत्मविश्वास नक्की वाढेल. नेटाने न घबरता प्रयत्न करीत रहा. स्वामी कृपेने यश निश्चित आहे.

आणखीन स्वामी समर्थ प्रबोधित बरेच ज्ञानविचार सांगायचे आहेत. परंतु पुढील लेखांत. आपणांस सुयश चिंतितो. आणि येथेच थांबतो.

! शुभं भवतु ! शुभं भवतु ! शुभं भवतु !

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त । श्री स्वामी समर्थ महाराजकी जय ।

Scroll to Top