II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II
प्रसंगाध्ययन क्र. १
जीवन प्रसंग
- नवरा बायको दोघांना शिफ्ट ड्यूटी आहे. बी पी ओ अथवा कॉलसेंटर मधील अखंड बडबडकरण्याचं तसेच प्रत्येकाला विचारपूर्वक योग्य उत्तर तातडीने देण्याचं काम आहे. प्रत्येकाच्या शिफ्ट बदलत्या असतात. अशा परिस्थीतीत कर्मयोगाचा संबंध कुठे व कसा? अशा वेळोवेळीं बदलत्या परिस्थितीत कर्म म्हणजेच साधना कशी होईल? फक्तकामाच्या वेळेस पुढे असलेले टार्गेट कर्मयोगाखाली येतं का? प्रापंचिक गोल पूर्ण करण्याकरतां केल्या जाणार्या कृती सुध्दां कर्मयोगा खालीं मोडतात? केवळ धनप्राप्तीच्या उद्देशाने केलेल्या कृती नव्हेत तर पति-पत्नी प्रेमापोटीं एकमेकाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृती सुध्दा? कर्म आणि कर्तव्य यांत फरक काय?
- पती अथवा पत्नी, एकाला फिरतीची नोकरी आहे. फक्त आठवड्याच्या शेवटीं एक किंवा दोन दिवस बरोबर असतात. अर्थार्जनाच्या कार्यात उत्तम गुणवत्ता ठेवण्या व्यतिरिक्त इतर कुठली कर्मे कर्मयोगाखाली येतील? दोघांनी एकमेकावर विश्वास ठेऊन वागणे जरुरीचे. कर्मयोगाचा संबंध इथे कसा?
विश्लेषण
दोन्ही समस्यांचा रोख जवळपास सारखाच आहे. त्यामुळे खालील विश्लेषण दोघांना लागू पडते.
देहाकडून होणार्या सर्व कृतींच्या बाबतीत कर्मयोग लागू होतो. दिवसातला जास्तीत जास्त वेळ मनुष्य धनार्जनासाठीं घालवतो. त्यामुळे त्या कृतीच्या संदर्भांत वर्णन केले जाते. प्रत्येक व्यक्तीला सर्व प्रकारच्या जबाबदार्या (कौटुंबिक तसेच सामाजिक) जीवनांत पार पाडाव्या लागतात. जबाबदार्या पार पाडण्यासाठीं कराव्या लागणार्या कृती, कर्तव्य म्हणून ओळखल्या जातात. ही सगळी कर्तव्य कर्मे विहितकर्म या सदाराखाली येतात. वयोगटा प्रमाणे विहितकर्मे थोडी बदलतात. वयोगटाचा विचार आश्रम या संकल्पनेत होतो. व्यक्तीच्या वयानुसार चार गट निर्धारित केले आहेत. प्रत्येक गटाला आश्रम म्हणतात. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम, असे चार गट आहेत. आश्रमा प्रमाणे कर्तव्यांचा प्रकार तसेच प्राधान्यक्रम बदलतो. ब्रह्मचर्याश्रम वयाच्या २० वर्षां पर्यंत. गृहस्थाश्रम वय वर्षे २० ते ६०. वानप्रस्थाश्रम वयवर्षे ६० ते ७५. संन्यास आश्रम वयवर्षे ७५ पुढे देहत्यागा पर्यंत. ब्रह्मचर्याश्रमात प्राधान्य सर्व प्रकारच्या शिक्षणाला, आणि विद्यार्जनाला असते. गृहस्थाश्रमात सर्व प्रकारची कौटुंबीक कर्तव्ये, मुलांचे संगोपन व संस्कार, तसेच सामाजिक कर्तव्ये जबाबदारीने पार पाडणे ह्याला प्राधान्य असते. अपत्याचे वय ८ वर्षे होईपर्यंत मातेनेच संस्कार करावेत असे सांगितले आहेत. त्यानंतर पित्याने आणि गुरुजनांनी संस्कार करावेत असे स्पष्ट केलले आहे. तसेच घरांत सलोख्याचे सामंजस्याचे वातावरण टिकवून ठेवणे जरुरीचे असते. वानप्रस्थाश्रमांत सर्वप्रकारचे निर्णय स्वातंत्र्य पुढील पिढीकडे सुपूर्द करणे, आपण त्यांत ढवळाढवळ न करतां नातवंडांवर चांगले संस्कार करीत घरांतच मानसिक दृष्ट्या अलिप्तपणे, निरासक्तवृत्तीने राहाणे. अडी अडचणीला पुढील पिढीला मदतीचा हातभार लावणे. इत्यादी बाबींना प्राधान्य देणे जरुरी असते. वनांत जाऊन शारिरिक दृष्ट्या अलिप्त होणे जरुरी नाही. संन्यास आश्रमांत संन्यस्त वृतीने केवळ परमेश्वर प्राप्तीच्या साधनेवर लक्ष केंद्रित करणे, याला प्राधान्य आहे. परंतु भगवी वस्त्रे धारण करणे जरुरीचे नाहीं. एक लक्षांत घ्या. परमेश्वरप्राप्तीचा उद्देश सर्व आश्रमात उच्च प्राधान्यक्रमावरच असतो. परंतु संन्यास आश्रमात केवळ त्यालाच प्राधान्य असते.
सध्याच्या काळांत जीवन शैली झपाट्याने बदलत आहे. सुखासीनते कडे जास्त जास्तच झुकत आहे. त्यापोटीं गरजा पण बर्याच प्रमाणांत वाढल्या आहेत. सर्व प्रथम पति पत्नी दोघांनी आपल्याला जीवनांत काय हवे? आपला जीवनाचा गोल काय? जबाबदार्या नक्की कुठच्या? हे निश्चित करणे जरुरीचे. त्यानंतर, जबाबदार्या पेलत आपल्याला राहाणी मान कुठच्या पातळी पर्यंत उचावायचे आहे? कुठे व कोणी पडते घ्यायचे? कशाच्या बाबतीत तडजोड करायची? या सर्व मुद्यांबाबत सहमतीने निर्णय घेणे जरुरीचे आहे. त्या प्रमाणे प्रत्येकाच्या कौटुबिक जबाबदार्या निश्चित केल्या पाहिजेत. परस्पर सामंजस्याने परस्पर सहकार्याने जबाबदार्या पेलण्याचा कृती आराखडा नक्की केला पाहिजे. वेळोवेळीं बदलत्या परिस्थिती प्रमाणे, सोयी प्रमाणे कृती आराखड्यात बदल केला पाहिजे. हे सर्व करताना घरांत सामंजस्य टिकून राहाणे गरजेचे. हे सर्व विचारांत घेऊन रोजचा कृतीआराखडा ठरवावा. प्रत्येकाचे विहितकर्म ठरवावे. विहितकर्म ठरवण्याच्या प्रक्रियेत कर्मयोगाचा सहभाग नसतो. विहितकर्म कर्तव्याच्या पायावर, नीतिशास्त्र तसेच वर्ण-आश्रम- धर्म या संबंधी ज्ञानाच्या आधारे ठरवले जाते. कर्मयोगाचा संबंध प्रत्यक्ष कर्म करताना असणार्या मानसिक स्थितीशी आहे.
प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेले विहितकर्म आनंदाने करावे. मनापासून सकारात्मक विचाराने कर्म केल्यास अडथळे, समस्या येत नाहीत. व आल्यास त्याचे त्वरित परिमार्जन करता येते. परंतु अनिच्छेने कर्म करीत असल्यास मन आणि बुध्दी यांचा जोरदार संघर्ष पावलो पावली होतो. प्रत्येक कृती करताना बुध्दीला मनावर वैचारिक दडपण टाकून त्याच्या करवी शारिरिक कृती करवून घ्यावी लागते. मनाचा विरोध चालूच रहातो. त्यामुळे बुध्दीला प्रसंगानुरूप विचार करायला फुरसतच मिळत नाही. अर्थात कृती संबंधी अविचारी निर्णय घेतले जाण्याची शक्यता बळावते. परिणामस्वरूप प्रत्येक टप्यावर समस्या निर्माण होतात. मानसिक दडपण वाढते. कार्य सुरळीत होत नाही. अशा परिस्थितीत शक्तीचा, ऊर्जेचा अपव्यय होऊन जबरदस्त मानसिक थकवा जाणवतो. ज्ञानविचारांच्या आधारे मनाला समजावण्यात जर यश आले, तर मनाचा विरोध कमी होऊन त्याचा फायदा होतो. संघर्ष व थकवा कमी होतो.
सध्याच्या काळांत मनुष्य दिवसाचा जास्तीत जास्त वेळ धनार्जनाच्या कार्यात घालवतो. त्यामुळे त्याविषयीं चर्चा केली जाते. परंतु दिवसातील सर्व कृती परमेश्वरप्राप्तीचा, अखंड आनंद मिळवण्याचा उद्देश समोर ठेऊन करणेच श्रेयस्कर आहे.
दैनंदिन व्यावहारिक कृतींचे परिवर्तन साधनेत कसे करायचे?
सर्वप्रथम परमेश्वरप्राप्ती करणे हाच जीवनाचा उद्देश नक्की करा. ठाम निश्चय करा. सतत अखंड, प्रत्येक कृती करताना लक्षांत ठेवा. आठवा. त्यायोगे प्रत्येक कृती परमेश्वरप्राप्तीच्या उद्देशाने होईल. आपोआप साधनेत परिवतिर्तित होईल.
परंतु परमेश्वरप्राप्तीचा उद्देश प्रत्येक कृती करताना लक्षांत रहाणे अतिशय कठीण आहे.
त्यासाठी कर्म, ज्ञान आणि भक्ती यांच्या संयोगाने परमेश्वराचे अखंड अनुसंधान प्रस्थापित करणे जरुरीचे आहे. भगवंताची आठवण, सतत करण्याची, स्मरण सतत ठेवण्याची संवय जाणीवपूर्वक करावी लागते. कर्मयोग , ज्ञानयोग, आणि भक्तियोग तीन्ही मार्ग एकमेकाला पूरक आहेत. त्यांचा प्रयोग सायमल्टेनिअसली करावा लागतो. अनुसंधानामुळे भगवंताचे स्मरण सतत प्रत्येक कर्माच्या वेळेस क्षणोक्षणी असल्याने कार्यात भगवंताचा सहभाग आपोआप होतो. त्यामुळे प्रत्येक कर्म परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने सहाय्यभुत ठरते. त्यामुळे अशा मनुष्याचे प्रत्येक कर्म वरकरणी व्यावहारिक वाटले तरी अंतकरणातून परमेश्वरप्राप्तीच्या हेतूनेच परमेश्वरप्राप्तीसाठींच होते. म्हणजेच साधनेत परिवर्तित होते.
परंतु भगवंता बरोबर अनुसंधान प्रस्थापित करणे सोपे नाही. पण प्रयत्न साध्य आहे. त्यासाठी भक्तीचा आधार घ्यावा लागतो. भक्तीच्या आधारे अनुसंधान सिध्द होऊ शकते. भगवंताबरोबर आपुलकी विकसित करण्याचे प्रयत्न म्हणजेच भक्ती. भक्तीमार्गा संबंधी ज्ञान मिळवून, आत्मसात् करून, उद्देश सतत समोर ठेऊन, त्यावर लक्ष ठेऊन, कर्मयोगाच्या प्रणालीचा प्रयोग करावा लागतो. ज्ञान भक्ती आणि कर्म तिघांचा समन्वय साधावा लागतो.
आठवण नाम आणि रूपाशी निगडीत असते. भक्त स्वतच्या आवडीचे इष्टदेवतेचे स्वरूप डोळ्यासमोर आणत इष्टदेवतेला नावाने हाक मारतो. भगवंत आपल्या हाकेला निश्चित प्रतिसाद देईल या विश्वासाने , या धारणेने, एका पाठोपाठ एक हाका मारतच रहातो. ह्याच प्रक्रियेला नामस्मरण म्हणतात. पुढे पुढे नामस्मरण आंगवळणी पडते व त्याची संवय लागते. त्याची आवड निर्माण होते. भगवंताबद्दल प्रेमभावना हळू हळू निर्माण होऊ लागते. भगवंताबद्दल आपुलकी विकसित होऊ लागते. भगवंत आपल्यातलाच वाटू लागतो. प्रेमभावना म्हणजेच प्रेमभाव. भगवंताचे भक्ताबद्दलचे प्रेम स्वयं सिध्द असतेच.त्या प्रेमापोटीच भगवंत भक्ताला सर्वतो परी सहाय्य करतो.
प्रेमभावा पोटीं भगवंताशी स्वतच्या आवडीचा नातेसंबंध मनोमन विकसित करण्याचा प्रयत्न भक्त करतो. “त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव” ही विचार धारा त्यासाठीच सांगितली आहे. मनुष्य मातेची आठवण मरेपर्यंत कधीच विसरत नाही. भगवंताला माता मानून, त्या संबंधीचे विचार भक्त मनांत सतत घोळवतो. परिणामस्वरूप भगवंताबरोबर भावबंध प्रस्थापित होतो. भावना ही एक प्रचंड प्रभावी शक्ती आहे. ही शक्ती भगवंताबरोबर अनुसंधान सिध्द करण्याची क्षमता बाळगते. भगवंता सोबत भावनांचा संबंध प्रस्थापित करते. भावनांची आर्तता दिवसें दिवस वाढतच जाते. प्रेम भावनेची परिणती प्रथम अनन्यभावात होते. आणि पुढे पुढे शरणभावात, व नंतर समर्पणभावात होते.
” आवडीने भावे हरीनाम घेसी। तुझी चिंता त्यासी सर्व आहे। “
ह्या संतांच्या सांगण्यावर संपूर्ण भरवसा ठेऊन विश्वासाने, निशंकपणे भक्त प्रापंचिक जबाबदार्यांचा भार तसेच पारमार्थिक प्रगतीची चिंता सर्वकांही भगवंतावर सोडतो. स्वतः निर्धास्त होतो. भगवंत आपल्या देहाकरवीं स्वतच कार्य करीत आहेत अशी धारणा दृढ होते. कर्मफळा संबंधी निर्णय भगवंतच घेतो. तो माझाच आहे. माझे हित जोपासेलच. मला योग्य ते कर्मफळ देईलच. हा बळकट विश्वास असतो. त्यामुळे कर्मफळाबद्दल निश्चिंत असतो. कर्म करताना फळासंबंधी विचार नसतोच. भगवंताच्या पाठबळाच्या जोरावर निर्भयपणे परिणामांची चिंता न करतां जगताचे सर्व व्यवहार करतो. परंतु स्वत सतत भगवंताच्या चिंतनात स्मरणात रममाण असतो. ह्या अवस्थेत, भगवंतच भक्ताच्या सर्वागिण प्रगतीची संपूर्ण जबाबदारी उचलतात. त्याच्या देहाद्वारे स्वत:च कृती करतात. त्यामुळे भक्ताकडून घडणारी प्रत्येक कृती परमेश्वरप्राप्तीची साधनाच ठरते.