प्रसंगाध्ययन क्र. २

!!श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ!!

प्रसंगाध्ययन क्र. २

जीवन प्रसंग

एका सोसायटी मधे पांचव्या मजल्यावर राहाणारे एक वृध्द जोडपे. त्याच सोसायटीत सहाव्या मजल्यावर एक व्यसनी तरूण मुलगा आपल्या विधवा आईबरोबर राहातो. दोघांचे प्लॅट एकमेकाच्या वर खाली आहेत. हा व्यसनी मुलगा रात्री अपरात्री येऊन बर्‍याच वेळा धुंदीमधे आपले घर समजून या वृध्द जोडप्याच्या घराची बेल वाजवतो. आजोबांना गुढग्याचा त्रास आहे. झोपेतून उठून दरवाजा उघडायला वेळ लागतो तो पर्यंत हा व्यसनी तरूण चार पांच वेळा बेल वाजवतो. आजोबांनी दरवाजा उघडल्यावर त्याला हे आपलं घर नाही याची जाणीव होते. दिलगीरी वगैरे व्यक्त न करतांच झोकांड्या देत एक मजला वर चढून आपल्या घरी जातो. आजीही जाग्या झालेल्या असतात. दोघांच्या झोपेचं खोबरं झालेलं. हा प्रकार महिन्यातून चार पांचवेळां तरी घडतो. आजी आजोबा सरळमार्गी , शांत स्वभावचे म्हणजेच नेभळट, पुचाट किंवा षंढ. त्या मुलाच्या विधवा आईकडे आजोबांनी तक्रार केली, पण ती स्वतच हतबल. पोलिसांकडे तक्रार करतो असं आजोबांनी तिला सांगितलं, तर ती म्हणाली हा मवाली गुंड पोरगा तुमचं बरंवाईट करायला मागे पुढे बघणार नाही. सोसायटीचे पदाधिकारी हात झटकून मोकळे झाले. आता या समस्येवर तोडगा काय? आपल्या कारणदेहस्थित संचित साठ्यापैकी हा नियोजित प्रारब्धाचा भोग आहे असं मानून आजी आजोबांनी हा त्रास निमूटपणे सहन करायचा, का भाडोत्री गुंडांकरवी या तरुणाचा कायमचा बंदोबस्त करून इच्छा नसतानाही नव्या कर्म बंधनात स्वतला अडकवून घ्यायचे? कर्मबंधनात न आडकतां अशाप्रकारची एखादी समस्या कशी सोडवायची?

क्रियमाणाचा सुयोग्य वापर कसा करायचा हे एखाद्या उदाहरणाने स्पष्ट केले तर समजण्यास सोपे जाईल. योगसाधनेच्याद्वारे क्रियमाण करण्याचे कौशल्य आत्मसात् करता येते. असं म्हटलं आहे. पण योगसाधना ही प्रदीर्घ कालावधीची साधना आहे. एखाद्या सांप्रत समस्येबाबात क्रियमाण काय असावे ज्या योगे त्या समस्येचे त्वरित निवारण होऊ शकेल. असं मार्गदर्शन सोदाहरण मिळाल्यास सामान्य संसारी साधकास ते जास्त उपयुक्त ठरेल असं वाटतं.

वरील आजोबांच्या काल्पनिक कथानकांत आपण आणखी एक काल्पनिक पात्र आणू. त्यांचा तरणाबांड, व्यायामाने शरीर कमावलेला नातू त्यांच्याकडे चार दिवस रहायला येतो. अध्यात्माची साधनेची आवड असलेला नियमीत जपजाप्य, योगक्रिया करणारा हा तरूण नातू सरळमार्गी तसेच निर्व्यसनी आहे. आजोबांकडून त्याला दारुड्या मुलाकडून होणारा त्रास समजतो. त्याच रात्री योगायोगाने तो दारुडा बेल वाजवतो. नातू झटक्यात उठून दार उघडतो आणि त्या दारुड्याच्या कानाखाली सणसणीत वाजवतो. त्यांची गचांडी पकडून वरच्या मजल्यावर त्याच्या आईकडे येतो व तिला बजावतो की मुलगा तुमचा आहे, त्याला कसं सांभाळायचं ते तुम्ही ठरवा. एक लक्षांत ठेवा. आज मी फक्त कानफटात मारली आहे. पण माझ्या आजीआजोबांना याचा थोडा जरी त्रास झाला तर गांठ माझ्याशी आहे. वरच्या टेरेसवरून मी त्याला खाली फेकून देईन. जेलमधे गेलो तरी बेहत्तर ! याला सांभाळा आणि समज द्या.

आतां प्रश्न असा पडतो की कर्मबंधनात नक्की कोण आडकलं? नातू की आजोबा? आजोबा वयोमानामुळे इच्छा असून देखील हात टाकू शकत नव्हते. नातवाला या दारुड्याचा नेहमीचा त्रास नव्हता. तो फक्त चार दिवसांचा पाहुणा होता. आजोबांवरील प्रेमापोटी आणि त्यांची असहाय्य परिस्थिती बघून त्याने त्या क्षणी निर्णय घेतला. आणि दारुड्याला फटकावले. कर्मबंधनाच्या न्यायामधे दोषी कोण. प्रत्यक्ष कृती करणारा नातू, की असं घडावं अशी सूप्त इच्छा मनात बाळगणारे आजोबा? की हे कर्म करण्यास भाग पाडणारा तो दारुड्या? सरळमार्गी सर्वसामान्य माणसाने अशा परिस्थितीत योग्य निर्णय कसा घ्यायचा?

विश्लेषण

मार्गदर्शन करण्याची क्षमता व पात्रता माझ्याकडे नाही. परंतु एक सूचना म्हणून सुचलेले विचार चिंतनार्थ मांडतो.

आपण स्वतला कमी किंवा गौण लेखू नका. शारिरिक बल वाढवणे उतारवयामुळे तितपत शक्य होईल असे नाही. परंतु मानसिक बल वाढवणे प्रयत्न साध्य नक्कीच आहे. स्वामींचा भक्त निर्बल कधीच नसतो. स्वामींचे पाठबळ सतत असतेच. तसे स्वामींचे स्पष्ट अभिवचनच आहे. पण स्वामींच्या वचनावर विश्वास असणे जरूरीचे. सर्वप्रथम, स्वामीं सहाय्य करतातच यावर विश्वास पाहिजे. जरा सुद्धा शंका नको. विश्वास जस जसा दृढ होत जातो तस तसे त्याचे परिवर्तन हळू हळू श्रद्धेत होते. श्रद्धा, विश्वास हेच काम करतात. स्वामी सांगतातच निर्भय व्हा. निश्चिंत व्हा. प्राप्त परिस्थितीशी निर्भयपणे सामना करा.

संत सत्पुरुष सांगतात, कुठल्याही परिस्थितीत रागावू नका. क्रोध आवरा. शांत चित्ताने सर्वांगीण विचार करा.

विचारपूर्वक कृतीसंबंधी निर्णय घ्या. नंतरच त्यानुसार कृती करा. परिणामस्वरूप सुख तुम्हालाच, दुःखपण तुम्हाला. तुमच्या विचारांमधे प्रचंड सामर्थ्य दडलेले आहे. विचारांची दिशा बदला. विचारपद्धती बदला. धारणा प्रयत्नपूर्वक बदला. नशीब आपोआप बदलेल.

 

वयाप्रमाणे शरीर क्षीण होणारच. अंथरुणातून उठून पटापट दरवाजा उघणे उघडणे सुध्दा क्लेशदायक ठरणे स्वाभाविकच आहे. परंतु आपण नमूद केलेला वरचेवर होणारा त्रास, हा प्रारब्ध भोगच आहे. भोगण्या व्यतिरिक्त गत्यंतर नाही. भोगल्याशिवाय सुटका नाही. हे सुध्दा खरेच. परंतु वाट्याला आलेला भोग आनंदाने भोगायचा का रडत खडत कुंथत भोगाचा, हे प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर ठरवाचे. मुकाट्याने अनिच्छेने भोगण्यात स्वारस्य नाही. पूर्व जन्मी त्या आजोबा आजींनी त्या व्यसनी मुलाच्या जीवात्म्याला त्रास दिलेला असणार. त्याची परतफेड तो या जन्मी संधी मिळाल्याबरोबर करीत आहे. एकमेकांत गुंतलेले प्रारब्ध असंच काम करतं. आजोबांनी घडणार्‍या घटनेचा मानसिक त्रास करून घेतला तर क्रोधाची भावना निर्माण होईल. तसेच उट्टं काढण्याची, सूड घेण्याची इच्छा निर्माण होईल. त्या इच्छेपासून परत गुंतलेलं प्रारब्ध निर्माण होणार. ती वसुली करण्यासाठी परत जन्म घ्यावा लागणार. प्रत्येक जण असंच हळू हळू स्वतच्या पुढील जन्माचे प्रारब्ध ठरवीत असतो. ह्या चक्राला शांत चित्ताने खीळ घालणे, ब्रेक लावणे गरजेचे आहे. सावधगिरी बाळगून अशा चुकांची पुनरावृत्ती टाळणे गरजेचे. तरच या चक्रांतून सुटण्याची शक्यता. तेव्हां शांत चित्ताने, कोणाबद्दल ही आकस न धरता, भोग भोगून संपवणेच दीर्घकालीन हिताचे. भोग संपण्याच्या वेळेस कुठल्यातरी प्रकारे मदत मिळेल व त्रास थांबेल. क्रियमाणाचा सुयोग्य वापर तो हाच. प्राप्त परिस्थितीचे अशाप्रकारे स्वत:च ज्ञानाधिष्ठित विश्लेषण करून समस्येला धैर्याने सामोरे जाणे, हाच क्रियमाणाचा सुयोग्य वापर. मनोबल वाढवल्यास हे शक्य आहे. अशक्य आजीबात नाही. कुठल्याही परिस्थितीत मन शांत असणे जरुरीचे.

त्या दारुड्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ज्या दिवशीं नशा जास्त होईल त्या दिवशीच अनवधानाने विचारक्षमता बरीच कमी झाल्याने ,वर उल्लेखलेला प्रमाद घडत होता. तो जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने हा प्रमाद करीत नव्हता. तेव्हां ती व्यक्ती स्वतची नशा जो पर्यंत नियंत्रित करीत नाही तो पर्यंत हा प्रमाद घडणारच. त्यावर केवळ तोच नियंत्रण ठेऊ शकतो. ते नियंत्रण आजोबांच्या हातात नाही. केवळ बळाने समस्या सुटेलच अशी खात्री देता येत नाही. आजोबांना मानसिक समाधान नक्की मिळेल. स्वामींवर विश्वास ठेऊन त्यांच्यासमोर आपले गार्‍हाणे मांडावे. परंतु भोग सरल्यावर निश्चितच सुधारणा होईल. भोग सरायच्या वेळेस कांही तरी अनपेक्षित घटना घडतील व मार्ग निघेल. यांत कोणीही दोषी नाही. केवळ ईश्वरी न्यायाचा हा आविष्कार आहे.

एक सिध्दांत लक्षांत ठेवा. प्रत्येकाचे जीवन हे एक जगताच्या मंचावर खेळले जाणार्‍या नाटकाचा एक भाग आहे. ईश्वरच प्रत्येक जीवाला कळसूत्री बाहुलीसारखे नाचवतो. सर्व जीवांना नाचवून आपली करमणूक करून घेतो. आपला संबंध फक्त नाटकातल्या भूमिके पुरताच. जीवन मर्यादा संपताच ते पात्र मंचावरून एक्झिट घेते. एकदा हा सिध्दांत अंतकरणात पक्का बसल्यावर, आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा त्रास होणार नाही. प्रारब्ध प्रवाहानुसार घडणार्‍या घटनाक्रमाला जीवन नाट्याच्या प्रसंगक्रमाला गुणक्रीडा असे नांव आहे. हा घटनाक्रम जन्मापूर्वीच नक्की झालेला असतो. त्यात फेरफार करता येत नाही. हे सर्व मनुष्याच्या नियंत्रण क्षेत्राच्या बाहेर आहे. तेव्हां घडणार्‍या बर्‍या/ वाईट घटनेचा मानसिक त्रास करून घ्यायचा नसतो. आपलं लक्ष फक्त ईश्वरप्राप्तीवरच केंद्रित ठेवायचं.

कर्माच्या हेतूच्या आधारेच कर्मफळ ठरवले जाते. कर्मफळासंबंधी निर्णय ईश्वरी यंत्रणाच घेते. ही प्रक्रिया मनुष्याच्या नियंत्रण क्षमतेत नाही. त्यामुळे त्यासंबंधी विचार करण्यात वेळ व शक्ती वाया घालवणे अयोग्यच. निर्धारित कर्मफळ भोगणे बंधनकारक असते. त्यालाच कर्मबंधन म्हणतात. दुसर्‍याच्या गुणदोषांचा विचार करण्यापेक्षां आत्मपरीक्षण करून स्वतच्या मानसिकतेचा मागोवा घ्यावा. स्वतचा हेतू शुध्द ठेवण्याचा प्रयत्न करावा. तेच फायद्याचे ठरेल. प्राप्त परिस्थितीचे ज्ञानाधिष्ठित विश्लेषण करून कृतीसंबंधी निर्णय घ्यावा.

श्री संत एकनाथ महाराजांच्या आयुष्यातील घटना आहे. ते रोज प्रातकाळीं गोदावरिवर स्नानासाठी जात असत. तसेच स्नान आटोपून ठराविक रस्त्याने परत घरी जात. एक दिवस एका गावगुंडाला त्यांची खोडी काढण्याची बुध्दी झाली. एकनाथ महाराज स्नान आटोपून घरी जात असताना हा गावगुंड त्यांच्या अंगावर पानखाऊन मुखरस थुंकला. त्यानंतर एकनाथ महाराज परत नदीवर गेले. परत स्नान करून घरी जाऊ लागले. ह्या गावगुंडाने तेच कृत्य परत केले. असा प्रकार अगणित वेळा झाला. एकनाथ महाराज तेवढ्यावेळा गंगास्नान घडवले म्हणून त्याचे आभारच मानीत होते. अखेरीस त्या गावगुंडास उपरती होऊन स्वतची चूक कळली आणि तो एकनाथ महाराजांना शरण गेला. त्यांचा शिष्य झाला. एकनाथ महाराजांनी केलेलं प्राप्त परिस्थितीचं विश्लेषण लक्षांत घ्या. त्यांनी काढलेला निष्कर्ष लक्षांत घ्या. आपण संत नाही. परंतु संतांचा आदर्श ठेवणे गैर नाही. त्यांच्या विचारांपासून बोध घेणे चांगलेच.

मनोबल कसे वाढवायचे? मनाची शक्ती कशी वाढवायची? मनाला आवर कसा घालायचा?

शरीराला झोपेद्वारे विश्रांती मिळते. परंतु मनाचे व्यवहार दिवस रात्र चालू असल्याने, मनाला विश्रातीची नितांत गरज असून सुध्दां, विश्रांती मिळत नाही. स्वामीसंदेश पुस्तकांत पृष्ठ क्र. ५ वर ध्यान नामक मानसिक प्रयोगाबद्दल माहिती आहे. त्याचा अभ्यास करून नियमित सराव करावा. त्यायोगे मनाला विश्रांती मिळेलच. शिवाय मनावर दडपण टाकणार्‍या वैचारिक कचर्‍याचा निचरा करता येईल. बुध्दीची कार्यक्षमता सुधारेल. स्वतची चूक वेळीच लक्षांत येऊन सुधारण्याच्या संधीचा लाभ उठवता येतो. मनतत्वाचे नियंत्रण विचार प्रक्रियेद्वारे बुध्दितत्वच करते.

विचारमालिका विकसित होण्याची दिशा धारणेवरून ठरते. ज्ञानाधिष्ठित शुध्दधारणा प्रयत्नपूर्वक विकसित करून विचारांना वळण लावता येते. त्यामुळेच धारणाबदलाला अनन्यसाधारण महत्व आहे. लक्षपूर्वक, नेटाने सुयोग्य धारणा विकसित करणे जरुरीचे.

विचारमालिका एका विचारापासून सुरू होते. त्या पहिल्या विचाराला चित्तवृत्ती म्हणतात. चित्ताच्या स्मृतिकक्षांत साठवलेल्या रेफरन्स डाटाचा वापर करून तर्क वितर्क; संकल्प विकल्प यांच्या आधारे कल्पनाशक्तीच्या जोरावर, चित्त विचारमालिका विकसित करते. ह्या संदर्भात्मक मेमरी डाटाला विचार पध्दती अथवा धारणा म्हणतात. इंग्रजीमधे माईंडसेट म्हणतात. ही धारणाच विचारांना दिशा देण्याचे कार्य करते.

ह्या संदर्भात्मक स्मृतील विचारांची वर्गवारी खालीलप्रमाणे.

  • वेगवेगळ्या विषयांबद्दलच्या समजुती व विविध व्यक्तींच्या बद्दलची मते.
  • विश्वास बसलेल्या व दृढ झालेल्या श्रध्दा अथवा बिलीफ.
  • स्मरणांत ठसलेले आत्मसात् केलेले ज्ञान सिध्दांत विचार

ईश्वराशी संबंधित सत्यांबद्दलचे ज्ञान विचार ग्रहण करून, आत्मसात् करावेत. आत्मसात् केलेले विचार आपोआप धारणेत समाविष्ट होतात.करावेत. त्यायोगे धारणेतील ज्ञानविचारांचे प्रमाण वाढेल.

आत्मसात् झालेल्या ईश्वरा संबंधित सत्यांबद्दलच्या ज्ञानविचारांचे प्रमाण जस जसे वाढत जाईल तस तशी धारणा शुध्द होत जाईल. धारणेच्या शुध्दिकरणाबरोबरच मनोबल आपोआप वाढते. मनाची शक्ती पण आपोआप वाढते. प्राप्त परिस्थितीचे ज्ञानावर आधारित विश्लेषण करण्याची क्षमता विकसित होईल.

हा सगळा सूक्ष्म पातळीवरील विचार लक्षांत घेतल्यास धारणा बदलाचे महत्व लक्षांत येईलच. तसेच धारणा बदलण्याच्या मार्गाची दिशा पण कळेल. पुढील चिंतन व सुयोग्य दिशेने प्रयत्न स्वतच करणे आवष्यक आहे. प्रयत्न नेटाने करताना , दिशादर्शनाचे कार्य परमेश्वरी यंत्रणा करतेच.

ह्या ज्ञानाधिष्ठीत प्रयत्नांना ज्ञानयोग म्हणतात.

आता प्रयत्नांची दुसरी बाजू, विश्वास व श्रध्दा, ह्याबद्दल समजून घेऊ.

भगवंताबद्दल आपुलकी विकसित करण्याचा प्रयत्न करा. भगवंत आपलाच आहे. तो केवळ देव्हार्‍यातच नाही, तर आपल्याबरोबर सतत असतो, अशी भावना मनात सतत घोळवा. आवडीच्या दैवताचे नाम व स्वतच्या आवडीचे त्याचे रूप अशी जोडी सतत आठवत रहा. आठवण्याचा सतत प्रयत्न करा. नुसते नाम किंवा नुसते रूप नको. ह्यालाच नामस्मरण म्हणतात. सततच्या प्रयत्नांपासून त्याचीच संवय लागेल. पुढे पुढे त्याची परिणती

भगवंताबरोबर भावसंबंध, प्रेमसंबंध प्रस्थापित होण्यात होते. आठवण अखंड रहाते. ह्यालाच अनुसंधान म्हणतात. भगवंताबरोबर संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात श्रध्दा व विश्वास आपोआप विकसित होतात.

ह्या भगवंताबरोबर संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांनाच भक्ती म्हणतात.

ज्ञान आणि भक्ती दोन्हीची सांगड आवष्यक. त्यायोगे भक्त प्रपंचाचा सगळा भार भगवंतावर सोडून, स्वत आनंदात, भगवंताच्या भावसान्निध्यात मस्त, अखंड रहातो.

वरील विचारांचे चिंतन करा. त्यांतच आपल्या समस्यांचे उत्तर सापडेल अशी आशा करतो.

Listen Audio

or 

Download PDF

॥ शुभं भवतु। शुभं भवतु। शुभं भवतु॥
Scroll to Top