!! श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ !!
प्रसंगाध्ययन क्र. 3
जिज्ञासा
स्वामी समर्थ मठ, लोकमान्य नगर, ठाणे; येथील समक्ष चर्चे द्वारे एका गृहिणीने विचारलेली
कुठल्या तरी प्रवचनांत ऐकले होते, दुसर्याची निंदा नालस्ती करू नये. दुसर्याबद्दल वाईट बोलू नये. ते ज्ञानविचार आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न निश्चयपूर्वक केला. तरी सुध्दां मनांत वाईट विचार येतातच. दुसर्याची उणी दुणी काढली जातातच. ठरवून सुध्दां हे असं कसं होतं? कां जमत नाही?
कारण मीमांसा
ही समस्या सगळ्यांनाच भेडसावते. त्यासंबंधी घडलेल्या चिंतना द्वारे सुचलेले विचार, आपणापुढे मांडतो. स्वत: विचारपूर्वक प्रयत्नात सुधारणा करावी. ज्ञान सिध्दांत मनोमन पटला. तसेच प्रयत्न करण्याची इच्छा निर्माण झाली. हा केवळ तुमच्या पूर्वपुण्याईचा परिणाम. प्रयत्न स्वत:च नेटाने करावे लागतात. प्रयत्न कसे करावेत या संबंधी ज्ञान ग्रहण करून त्यावर स्वत: विचार करून, प्रयत्न पध्दतीत तसेच प्रयत्नाच्या मानसिकतेत सुधारणा करायच्या असतात. वेगवेगळ्या प्रकारे स्वत:च्या मनावर स्वत:च प्रयोग करायचे असतात. त्याचे परिणाम तपासून बघायचे असतात. ठरवल्याप्रमाणे आपल्याला सिध्दांत आचरणात आणणे जमले नाही. कांही हरकत नाही. निराश होऊ नका. परत सुधारित प्रयत्न करा. वेळोवेळी सुधारणा करीत प्रयत्न करायचे असतात. यश प्राप्त होई पर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीत. चिकाटीने प्रयत्न करायचे. अनंत जन्मांची जोपासलेली संवय सहजासहजी जात नाही. मन नाठाळ असते. सहजासहजी वळत नाही. मनावर जोर जबरदस्ती चालत नाही. मनाला त्याच्या कलानेच वळवावे लागते.
सर्वसामान्य मनुष्याला मानसिक पातळीवर कार्य करण्याची संवय नसते. त्यामुळे मानसिक पातळीवरचे काम कठिण वाटते. शारिरिक कृती करण्याची संवय जन्मजात असल्याने शारिरिक कृती सोपी वाटते. त्यामुळे मनुष्य सामान्यत: जपजाप्य, पूजापाठ, अनुष्ठाने, देवदर्शने, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, इत्यादी शारिरिक कृतीला प्राधान्य असलेल्या साधना पध्दती अवलंबतो. नेमाने सातत्याने आचरतो. परंतु सुयोग्य मानसिकते शिवाय नुसत्या शारिरिक कृतीचा काहीच उपयोग नाही. शारिरिक कृती सोबत भावना व विचार दोघांची सांगड पाहिजेच. भावना , विचार व शारिरिक कृती तीघांच्या संयोगानेच कार्यसिध्दी होते. तेव्हां मानसिकतेची सुधारणा डावलून चालणार नाही. स्त्रीची मूळप्रवृत्ती भावनाप्रधान असल्याने मानसिक पातळीवरील कार्य तिला सहज जमते.
उत्तर शोधण्यासाठी आणखी खोलात जाऊन विश्लेषण करणे जरूरी आहे.
मनाचे व्यवहार सर्वसामान्यत: मी आणि माझं या मूलभुत जाणिवेच्या आधारेच चालतात. ते नियंत्रित कसे करायचे? विचार प्रक्रिया नियंत्रित कशी करायची? यावर विचार करू.
कुठल्याही घटनेत मनुष्याचा मीपणा डिवचला गेल्यास विषयांच्या/ विकारांच्या असंख्य ऊर्मी मनांत धिगाणा घालतात. मी आणि माझं या जाणिवेपोटी प्रबळ भावना उद्दीपित होतात. भावना नेहमीच विचारांवर कुरघोडी करून आपलं तेच खरं करतात, असा बर्याच जणांचा अनुभव आहे. हा भावनांचा धिंगाणा कसा आवरायचा? विचारांचं महत्व कसं प्रस्थापित करायचं? भावनांपेक्षा विचारांचं नियंत्रण त्यातल्या त्यात सोपं आहे. पण दगडापेक्षा वीट मऊ एवढंच.
शारिरिक कृती संबंधी निर्णय घेण्याच्या विचार प्रक्रियेसंबंधी सखोल विचार मांडतो.
कारणदेहावर पूर्वकर्मांच्या नोदी तसेच अतृप्त इच्छांच्या नोंदी साठवून ठेवलेल्या असतात. अनंत जन्मांपासून जीवात्म्याने साठवलेल्या या नोंदी असतात. प्रत्येक जन्मी त्या साठ्यात भरच पडते. ह्या साठ्याला संचित म्हणतात. प्रारब्ध, जन्मापूर्वीच ह्या नोंदींच्या आधारे ठरते. पूर्वकर्मानुसार प्रारब्धवश भोवतालची स्थिती परिस्थिती प्राप्त होते. पंचज्ञानेन्द्रिये संवेदनांच्या द्वारे परिस्थितीची जाणीव करून देतात. त्यांच्या संदर्भाने कारणदेहावर अतृप्त इच्छांच्या, वासनांच्या, आधारे कृतिप्रेरणा अथवा ऊर्मी निर्माण होतात. प्राप्त संवेदना मी पणाच्या जाणीवेस धक्का देणार्या असल्यास, अथवा मीपणा डिवचला गेल्यास विकार उद्भव होतो. अति तीव्र प्रेरणा निर्माण होते. हीच प्रेरणा पुढे चित्तांत उतरून त्यापासून विचार प्रक्रिया सुरू होते. विकाराच्या प्रभावाने, मीपणाचे समर्थन करणार्या भावनात्मक विचारांचा कल्लोळ निर्माण होतो. विचारांचा मॉब आटोक्याबाहेर गेल्यास संभ्रम निर्माण होतो. या विचारांच्या मॉबला आटोक्यात ठेवणे जिकीरीचे असते. माणूस गोंधळतो. भयग्रस्त होतो. ही अव्यवस्था तात्काळ आडवणे गरजेचे असते. अन्यथा भावनात्मक विचारांच्या आहारी जाऊन अविचारी निर्णय होतो. निर्णय घेण्यास उशीर होतो. निर्णया प्रमाणे शरीर कृती करते. परिणामस्वरूप प्राप्त परिस्थिती चिघळून आणखीन बर्याच समस्या निर्माण होतात. विचारांची गर्दी नियंत्रित करण्यासाठीं , स्वामींनी समर्थांनी जालिम उपाय सागितला आहे. स्वामी समर्थ प्रबोधित भक्तिक्रियादर्शन नामक विषयावरील प्रवचन क्र, १३ मधील उतारा आहे.
प्रलोभन प्राप्त होते है। समस्याएँ संकट आजाते है। इसीको अवसर समझो। यही अवसर है। स्वामीनाम जोरशोरसे लेनेके लिये। चिंता उद्भव हो जाती है। यही स्थान है। यही अवसर है। स्वामीनाम सिध्द करनेका। भयग्रस्त हो जाते हो, स्थिती परिस्थितीके अनुसार। स्वामीसिध्दमंत्र सुनिश्चित निर्भय करेगा। और इसप्रकारसे विश्वास श्रध्दासे स्वामीसिध्दमंत्र अखंड अनुसंधानके प्रयोजनसे जो भक्त सिध्द करेगा, उसका कर्म पवित्र होगा।
स्वामीनामाचा विनियोग करून विचारांची गर्दी नियंत्रित केल्यावर, विचार मालिका विकसित होत असताना, धारणेतील ज्ञानविचारांचा संदर्भ घेऊन तर्क कुतर्क बुध्दी विचारमालिकेला सुयोग्य वळण लावते. शेवटी सत् असत् विवेक बुध्दी कृती संबंधी निर्णय घेते. त्यानंतर निर्णया प्रमाणे शरीर कृती करते. ज्ञानविचारांचा संदर्भ विचारात घेतल्यास ज्ञानाधिष्ठित, विचारपूर्वक कृती घडते. विचारपूर्वक केलेली कृती व्यवहारांत लाभदायकच ठरते. विकारांचे नियंत्रण होते. वासनांचे दुष्परिणाम टाळता येतात.
नामस्मरणाच्या द्वारे तुम्ही स्वामींचीच मदत आर्तपणे मागता. स्वामींच्यावर दृढ विश्वास, दृढ श्रध्दा असेल तरच नामस्मरणापासून परावृत्त करणार्या वैचारिक विकल्पांना तोंड देऊन नामस्मरण चालू ठेऊ शकता. अन्यथा भावनात्मक विकल्पांना बळी पडून, प्रयत्न अर्धवट सोडून, भावनांना सवता सुभा मोकळा करून देता.
नामस्मरण हे साधन आहे. वापरण्यास सोपे आहे. प्रगतीच्या प्रत्येक टप्यावरील विविध प्रकारच्या समस्यांवर तोडगा म्हणून वापरण्याजोगे आहे. शेवटी भगवंताबरोबर एकरूपता सिध्द करून देणारे साधन आहे. परंतु नामस्मरण हे साधनच आहे. साध्य नव्हे. गल्लत करू नका. स्वामिप्राप्ती/ परमेश्वरप्राप्ती हेच साध्य आहे. साध्य सतत दृष्टिपथात ठेऊन साधनाचा वापर केला पाहिजे. ध्येयावरील लक्ष विचलित होऊन चालत नाही. ध्येयावरील लक्ष टिकवून ठेवण्याच्या समस्येवर नामस्मरणच काम करते. स्वामींची मदत मिळवून देते.
मानसिक पातळीवरील समस्या परमेश्वरस्वरूप स्वामीच सोडवूू जाणे. त्यांची मदत पावलो पावली घेणेच श्रेयस्कर. मीपणाची जाणीव तरती ठेऊन, स्वामींना अपेक्षीत सुयोग्य मानसिकता विकसित होणे असंभव.
स्वामींना / सद्गुरूंना शरण जा. त्यांच्यावर सर्व भार सोडा. तेच स्वत: मार्ग दाखवतील. तेच कडेवर घेऊन खाचखळग्यांपासून संरक्षण करीत पुढे पुढे घेऊन जातील. ध्येयाची आठवण सतत ठेवल्यास एकरूपता सुध्दा तेच सिध्द करून घेतील. वास्तविक आपण कांहीच करत नसतो. मानसिक पातळी स्वामीच सांभाळतात.
नामस्मरणाचा वापर केवळ प्रापंचिक समस्या सोडवण्यासाठी करू नका. अस्त्र अमोघ आहे. जपून योग्य समस्येसाठीच विनियोग करा. कसे वापरायचे कुठे वापरायचे ते जाणकार व्यक्तींकडून, सदगुरूंकडून नीट शिकून घ्या.
विचार प्रक्रिया नियंत्रित करून आचरण सुधारणे, ज्ञानाधिष्ठित आचरण सिध्द करणे, गरजेचे आहे. हाच ईश्वरी प्रगतीचा पाया आहे. पाया जाणीवपूर्वक मजबूत करा.
विचार प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी सर्वप्रथम स्वत:च्या मानसिक व्यवहारांचे निरीक्षण करायला शिका. प्रत्येक विचार प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवा. सतर्क रहा. त्याची संवय लाऊन घ्या. सुरवातीला कृती घडल्या घडल्या चूक लक्षांत येईल. चूक सुधारण्याची संधी वापरता येईल. पुढे पुढे चूक घडताना चुकीची जाणीव होऊ लागेल. त्यापुढे अलिकडेच विचार प्रक्रिये दरम्यान जाणीव होईल. त्यापुढे प्रेरणा निर्माण होतांच जाणीव होऊन प्रतिबंधक उपाय योजण्याची इच्छा निर्माण होईल. त्याही पुढे प्रेरणा उद्भवतांच प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची संवय लागेल. हे प्रगतीचे टप्पे नक्कीच लक्षांत येतील. पूर्वपापांचे परिणाम अशाप्रकारेच जाळता येतात.
नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरिची।
नलगे सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण।।
ज्ञानाधिष्ठित आचरण सिध्द करण्यासाठी धारणाबदल हा महत्वाचा टप्पा. त्यासाठी स्वत:च स्वत:च्या मनावर ज्ञान विचारांचे आघात सतत करीत, वेगवेगळ्या प्रकारे स्वत:वरच प्रयोग करायचे असतात. वेळोवेळी परिणाम तपासून बघत, प्रयत्नात सुधारणा करीत सातत्याने चिकाटीने प्रयत्न करायचे असतात. अपेक्षित परिणाम सिध्द होई पर्यंत प्रयत्न नेटाने करायचे असतात.
प्रयत्नांती परमेश्वर आहेच.
वरील विवेचनासंबंधी स्वत: चिंतन मनन करा. तुमच्यासाठी तुमचे स्वत:चे विचारच महत्वाचे. चिंतन प्रक्रियेचा कंटाळा करू नका. त्यानंतर नेटाने परत प्रयत्न करा. ज्ञान आत्मसात् करून विनियोग करा. घाबरू नका. निर्भयपणे नि:शंकपणे प्रामाणिक प्रयत्न करा. स्वामींचे अभिवचन आहेच.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामि वचन
यद्यपि स्वामीका नाम बडे जोरशोरसे , बडे भक्तीसे विश्वास श्रध्दासे तथा प्रेमभरे संवेदनासे स्वामीका जयजयकार करेंगे, स्वामीनाम लेंगे, सारी जिम्मेदारी मुझपर आजाती है। तुम्हारी चिंता मेरी चिंता हो जाती है। तुम्हारी समस्या मेरी समस्या हो जाती है। तुम निश्चिंत हो जाएँगे। तुम निर्भय हो जाएँगे। यद्यपि स्वामीनाम बडी श्रध्दा विश्वास भक्ती प्रेमसे जोर शोरसे जयजयकार करते हुवे, अखंड अविरत जब ले जाएँगे, स्वामी प्रत्यक्ष प्रत्येक स्मरणमे होते है। यह सूत्र समझो।
स्वामीनाम लेते रहो। आनंदसे लो। श्रध्दा भक्तीसे लो। देह गेह मुक्ती भुक्ती प्रारब्धवश आएगी, जाएगी। किन्तु स्वामीप्रेम स्वामिभक्ती स्वामिअनुसंधान स्वामीनाम साधना दिव्य है। जिससे देवभावका उद्भव होगा। भक्तितत्वकी प्रचीती प्राप्त हो जाएगी।
-0-0-0-0-0-0-
निष्कर्ष
विचारसरणी बदलण्याचे प्रयत्न स्वत:लाच करावे लागतात. रेडीमेड उपाय नाहीत. विविध प्रकारे मनावर विविध प्रयोग करून मनाला समजावणे जरुरीचे. कुठचा प्रकार उपयोगी ठरेल हे सांगता येत नाही. चिकाटीने प्रयत्न चालूच ठेवावे लागतात. मनसिकतेला वळण लावण्याची हीच पध्दत आहे. जोर जबरदस्ती चालत नाही.
मानसिकता बदल अत्यंत महत्वपूर्ण आहे. नुसत्या शारिरिक कृतीचा कांहीच उपयोग नाही. शारिरिक कृती, भावना, तसेच विचार, तीघांच्या संयोगानेच कार्यसिध्दी होते. अन्यथा नाही. मानसिकता बदल; विचारसरणी सुधारणा दोन्ही महत्वाची.
मनाचे व्यवहार मुख्यत्वेकरून मी आणि माझं या जाणिवेच्या आधारे चालतात.
कुठल्या ही घटनेत मीआणि माझं या जाणीवेला धक्का लागल्यास, विषयांच्या/ विकारांच्या असंख्य ऊर्मी मनांत धिगाणा घालतात. मी आणि माझं या जाणिवेपोटी प्रबळ भावना उद्दीपित होतात. भावना नेहमीच विचारांवर कुरघोडी करून आपलं तेच खरं करतात, असा बऱयाच जणांचा अनुभव आहे. ह्या भावनात्मक विचारांची गर्दी आवरणं गरजेचं आहे. हीच मोठी समस्या आहे. स्वामी समर्थांनी ह्यावर नामस्मरण हा रामबाण उपाय सांगितला आहे. त्यायोगे स्वामींची मदत मिळवता येते. स्वामीच समस्या निराकरण करतात.
पूर्व पापकर्मांच्या परिणामस्वरूप मीपणा डिवचणार्या घटना आयुष्यांत प्रारब्धवश घडतात. त्यायोगे भावनांचा कल्लोळ निर्माण होऊन अविचारी कृती घडते. प्राप्त परिस्थिती आणखीनच चिघळते व जास्तच मनस्ताप होतो. भावना कल्लोळाला नामस्मरणाच्या द्वारे आवरून विचारपूर्वक निर्णय घेता येतो. समस्या निस्तरून पापकर्मांचा दुष्परिणाम जाळता येतो. पर्यायाने एक एक करून जन्मो जन्मी केलेली पापकर्मे जाळता येतात. नामस्मरणाचा उपयोग पूर्वपापे जाळण्यासाठीं अशाप्रकारे करता येतो.
नामस्मरण हे साधन आहे. साध्य नव्हे. परमेश्वरप्राप्ती; स्वामींची प्राप्ती हेच साध्य आहे. नामस्मरण हे हत्यार अथवा अवजार आहे. कुठे व कसे वापरायचे ते नीट शिका, आणि उपयोग करा. नामस्मरणाचा उपयोग केवळ प्रापंचिक समस्या सोडवण्यासाठीं करूं नका. मानसिक अति क्लिष्ट समस्या हाताळण्यासाठी जरूर करा. परमेश्वरप्राप्तीच्या उद्देशाने जरूर करा. अतिशय सोपे व प्रभावी साधन आहे.
ज्ञानाधिष्ठित आचरण सिध्द करण्यासाठी धारणाबदल हा महत्वाचा टप्पा. त्यासाठी स्वत:च स्वत:च्या मनावर ज्ञान विचारांचे सतत आघात करीत वेगवेगळ्या प्रकारे स्वत:वरच प्रयोग करायचे असतात. वेळोवेळी परिणाम तपासून बघत, प्रयत्नात सुधारणा करीत सातत्याने चिकाटीने प्रयत्न करायचे असतात. अपेक्षित परिणाम सिध्द होई पर्यंत प्रयत्न नेटाने करायचे असतात.
प्रयत्नांती परमेश्वर आहेच.
वरील स्वामी वचनां संबंधी स्वत: विचार करा. स्वत:ची उन्नती साधून घ्या. स्वामींचे अभिवचन पक्के लक्षांत ठेवा. स्वामींचा बाळ म्हणून निर्भयपने जीवन प्रसंगांना धैर्याने सामोरे जा.