!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
प्रसंगाध्ययन क्र. ५
जीवन प्रसंग
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, गिरगाव, मुंबई येथे माझ्यासमोर घडलेली घटना आहे. व्यवस्थापकांकडे एक अतिवृध्द तेजस्वी बाई तावा तावाने एका भामट्याबद्दल तक्रार नोंदवीत होत्या. त्या भामट्याचा वावर मठात नेहमी असल्याने त्या व्यवस्थापकांकडे पार करण्यास आल्या होत्या. त्या भामट्याने त्यांना तसेच अन्य अनेक वृध्द स्त्रियांना लुबाडले फसवले होते. त्या बाईंच्या बाबतीत घडलेल्या घटने च्या संदर्भात अध्यात्म शास्त्राrय दृष्टिकोनातून विश्लेषण कसे होईल ह्या बाबत चिंतन घडले. ते विश्लेषणात्मक विचार आपल्या चिंतनार्थ मांडतो.
मीमांसा
आजकालच्या दिवसांत अशा फसवणुकीच्या घटना पावलो पावली घडतात. बहुतेक सर्व व्यवहारात संभावित भामटे राजरोजपणे फसवत असतातच. समोरच्याला आपण फसवले गेल्याची जाणीवच नसते.यांची संख्या बरीच मोठी आहे. असे मोजकेच भामटे असतात, जे गैर मार्गाने फसवणूक करतात. त्यानी केलेली फसवणूक पटकन उघडकीस येते. नजरेत भरते.
व्यवहारांत फसवणूक करून लुबाडणाऱया व्यक्तींची कृती ईश्वर दरबारी प्रमादच असते. ईश्वरी यंत्रणे नुसार शारिरिक कृतीची नोंद होत नाही. हेतूची नोंद स्वयंचलित यंत्रणे द्वारे ताबडतोब होते. तुमच्या कारणदेहावर नोंद होते. त्यात कुठल्याही प्रकारे फेरफार करता येत नाही. फेरफाराची संधीच उपलब्ध नसते. घटनेच्या परिणामस्वरूप निर्माण होणार्या नूतन इच्छांची नोंद सुध्दा कारणदेहावर आपोआप होते. ह्या नूतन इच्छांपासून एकमेकात गुंतलेले ऋणानुबंध निर्माण होतच असतात. ईश्वरी नियंत्रण यंत्रणेच्या कारभाराविषयींच्या अज्ञानामुळे तुम्हाला याची जाणीव नसते. जन्मोजन्मींच्या ऋणानुबंधातून हे असे फसवणुकीचे प्रसंग सुध्दा घडतात. ऋणानुबंध नसल्यास रस्त्यावरील कुत्रा देखील तुमच्या अस्तित्वाची दखल घेऊन भुंकणार नाही. किंवा तुमच्या जवळ येणार नाही. भिकारी सुध्दा तुमच्याकडे दुर्लक्षच करेल. जेव्हां एखादा याचक तुमच्याकडे याचना करतो. त्यावेळेस तो पूर्व जन्मींच्या ऋणानुबंधामुळेच तुमच्याकडे येतो. पूर्व जन्मींचं त्याचं येणं वसूल करण्यासाठी. भामटा जबरदस्तीने अथवा तुम्हाला फसवून त्याचं येणं वसूल करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळे ईश्वरी यंत्रणेचे खेळ आहेत. तुमच्या जीवनातील घटना, तुमचं जीवन नाट्य हा सुध्दा त्या जगताच्या नाटकाचाच एक भाग आहे. ह्या खेळालाच प्राकृतिक गुणक्रीडा असं म्हणतात. मनुष्याचा संबंध फक्त त्याच्या वाट्याला आलेली भूमिका निभावण्यापुरताच असतो. पात्र जगताच्या मंचावर कधी प्रवेश करणार, कधी एक्झिट घेणार ह्या सकट संपूर्ण नाट्य संहिता प्रारब्धाच्या स्वरूपांत जन्मापूर्वीच निश्चित झालेली असते. स्वत:च्या जीवनातील प्रत्येक घटनेकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून बघण्यास शिका. हे साध्य करण्याचे प्रयत्न म्हणजेच साधना. हे सिध्द झालेला मनुष्य जीवनमुक्त होतो. त्याला विदेही अवस्था प्राप्त होते.
स्वामीभक्त अशा घटने बाबत कसा विचार करील?
भगवद्गीतेच्या बारव्या अध्यायात भक्ताची लक्षणे समजावत, भक्ताची विचारपध्दती सागितलेली आहे. त्यातील कांही मुद्दे येथे नमूद करतो.
अद्वेष्टा सर्वभूतानाम् – अनिष्ट करणार्यांचे दोन प्रकार आहेत. (1) इष्टाच्या प्राप्तीत अर्थात् धन, मान-सन्मान, आदर-सत्कार, इत्यादीच्या प्राप्तीत बाधा निर्माण करणारे आणि (2) अनिष्ट पदार्थ, क्रिया, व्यक्ती, घटना इत्यादींशी संयोग करवणारे.
भक्ताच्या शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये आणि सिद्धांताच्या प्रतिकूल मग कोणीही कितीही, कोणत्याही प्रकारचा व्यवहार करो, इष्टाच्या प्राप्तीत बाधा आणो, कोणत्याही प्रकारची आर्थिक आणि शारिरिक हानी करो, परंतु भक्ताच्या अंत:करणात त्याच्या विषयीं, कधीही, किंचित्मात्रही, द्वेश नसतो. कारण तो प्राणिमात्रात आपल्या प्रभूलाच व्याप्त पहातो. अशा स्थितीत तो विरोध करील तर कोणाशी करील? ऐवढेच नव्हे, तो तर अनिष्ट करणार्यांच्या सर्व क्रियांनाही, भगवंताच्या कृपेने पूर्ण असलेले मंगलमय विधानच समजतो.
मैत्र: करुण एव च – भक्ताच्या अंत:करणात प्राणीमात्रांविषयी केवळ द्वेषाचा अत्यंत अभाव नसतो, तर संपूर्ण प्राण्यांविषयीं भगवद्भाव झाल्याने त्याचा सर्वांशी मैत्री आणि दयेचा व्यवहारही होतो.
प्राणिमात्र स्वरूपाने भगवंताचेच अंश आहेत. म्हणून कोणत्याही प्राण्याविषयीं थोडा ही द्वेशभाव असणे , भगवंताविषयींच द्वेश होतो. म्हणूनच कोणत्याही प्राण्याविषयीं द्वेश राहिल्यास, भगवंताशी अभिन्नता तसेच अनन्यप्रेम होऊ शकत नाही. प्राणीमात्रांविषयीं द्वेषभावरहित झाल्यावरच भगवंताचे ठिकाणी पूर्णप्रेम होऊ शकते. म्हणूनच भक्ताचे ठिकाणी प्राणिमात्रांविषयीं द्वेषाचा संपूर्णपणे अभाव असतो.
आपले अनिष्ट करणार्याशीही भक्ताकडून मित्रतेचा व्यवहार होत असतो, कारण त्याचा भाव असा असतो की, अनिष्ट करणार्याने अनिष्टरूपांत भगवंताचे विधानच प्रस्तुत केले आहे. म्हणून त्याने जे कांही केले आहे, माझ्यासाठी योग्यच केले आहे, कारण भगवंताचे विधान सदैव मंगलमय असते. एवढेच नव्हे तर भक्त असे समजतो की, माझे अनिष्ट करणारा (अनिष्टाविषयीं निमित्त होऊन) माझ्या पूर्वकृत पापकर्माचा नाश करीत आहे. म्हणून तो विशप्रूपाने आदराचा पात्र आहे.
सर्व साधकांचे मनांत हा भाव रहातो आणि राहिलाही पाहिजे की, त्याचे अनिष्ट करणारा त्याच्या मागील पापांचे फळ भोगवून त्याला शुद्ध करीत आहे. सिद्ध भक्ताचा, सुखी आणि पुण्यात्म्याविषयी मैत्रीचा भाव तसेच दु:खी आणि पापात्म्याविषयी करुणेचा भाव राहातो.
दु:खी व्यक्ती पेक्षा दु:ख देणार्यावर (उपेक्षेचा भाव न ठेवता) दया केली पाहिजे. कारण दु:खी व्यक्ती तर (मागील पापांचे फळ भोगून) पापापासून मुक्त होत आहे. परंतु दु:ख देणारा नवीन पाप करीत आहे. म्हणून दु:ख देणारा दयेचा विशेष पात्र आहे.
भक्ताचे हे विचार अव्यवहार्य वाटतील. परंतु भगवतप्राप्तीच्या जवळील उच्च पातळीवरील हे विचार आहेत. अशा उच्चपातळीवरील विचारांतून भगवप्रेमच प्रदर्शित होते. ह्या भगवप्रेमाद्वारेच पुढे परमेश्वरप्राप्ती होते.
त्या बाईंनी, त्या भामट्याच्या कृत्यांचा दोष मठावर येऊ नये या हेतूने, मठाच्या व्यवस्थापकांना सावध करण्यासाठी पार केली असेल तर ती कृती व्यावहारिक दृष्ट्या बरोबरच ठरते. परंतु हेतू जर त्या भामट्याला अद्दल घडवण्याचा अथवा शिक्षा करण्याचा असेल तर एका स्वामीभक्ताच्या भूमिकेतून चूकच ठरते. ह्यातूनच न कळत, त्या जीवा बरोबर नवीन ऋणानुबंध निर्माण होतात. त्या वसुलीसाठी नवीन जन्म घ्यावा लागतो. अशी ऋणानुबंधाची साखळी सुयोग्य क्रियमाणाच्या अथवा नवीन कमार्माच्या जोरावर तोडल्या शिवाय जन्ममृत्यूच्या पातून सुटकेची शक्यताच नाही.
भक्तजन सावध व्हा. स्वत:ची विचारपध्दती बदला. सावधपणे दूरगामी परिणामांचा विचार करून मगच कुठलीही कृती करा. स्वामी हेच पावलोपावली सांगत आहेत. भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भक्तांनी मनावर घेतल्यास स्वामींचे कल्याणाचे कार्य सुलभ होईल. पर्यायाने भक्तांचेच कल्याण होईल.
वरील मीमांसेवर गंभीरतेने चिंतन करा. विचारपध्दतीत, पर्यायाने आचरण सुधारण्याचा अटोकाट प्रयत्न करा. स्वामी यश प्राप्तीसाठी कृपा करतातच. परंतु प्रयत्न केल्यासच त्याचा फायदा होतो.
स्वामी वचन
गंभीरतासे चिंतन करो। नियोजन करो। अन्यथा केवल श्रवणेंद्रियको एक श्रम दिया जाएगा। किन्तु इंद्रीय अपने रास्तेसे चलते जाएँगे। मन की पुरानी आदत परिवर्तित नहीं होगी। समाज अपने रास्तेपे चलता रहेगा।भक्त केवल पूजापाठ आरती करते है। किन्तु अपने नित्य जीवनमे बडे संभ्रममे बडे अज्ञान बडे समस्याग्रस्त जीवन व्यतित कर रहे है। इतने सारे भक्त इकठ्ठे आते है। घोष लगाते है। आरती उतारते है हमारे प्रतिमाकी। हमारे ज्ञानप्रबोधनका अधिष्ठान उनके आचरणमे कैसे प्राप्त हो जाय? एक एक सिध्दांत चिंतन करना पडेगा। अपने आचरणको सुधार करनेके लिये। अपने आचरणको पवित्र करनेके लिये। समय जा रहा है। समय हाथसे निकल जा रहा है। सावधान। समय नही रुकेगा। आपणांस बोध प्राप्त होऊन सुयश मिळण्यासाठी स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना.