अवस्था चातुष्ट्य

!! श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ !!

          मनुष्य जागा असतो. मनुष्य झोपतो. झोपेत विश्रांती घेतो. झोपेची आराधना करताना किंवा झोपेतून जागा होताना केव्हां केव्हां स्वप्न बघतो. हे सर्व आपल्याला परिचित आहेच. मनुष्य जागा असतो त्याला जागृत अवस्था म्हणतात. स्वप्ने बघतो त्याला स्वप्नावस्था म्हणतात. आणि झोपण्याच्या अवस्थेला सुषुप्त अवस्था अथवा निद्रावस्था असं म्हणतात. एवढ्या तीनच अवस्था सवर्वसाधारणतः ज्ञात आहेत.  परंतु ह्याच्या पलिकडे तूरीया नांवाचि चतुर्थ अवस्था देखील आहे.  ह्या अवस्थेबद्दल बद्दल मनुष्याला माहिती नसते.

        दुसरा समजः  ह्या सर्व अवस्था मनाच्या आहेत असं  समजलं जातं. परंतु ह्या  अवस्था जीवाच्या अथवा जीवत्म्याच्या अथवा पर्यायाने मनुष्याच्याच आहेत. एक एक करून प्रत्येक अवस्थे बद्दल सूक्ष्म माहिती जाणून घेऊ.

जागृत अवस्था:   मनुष्य बहुतांशी ह्याच अवस्थेत वावरतो. जीव जागृत असतो. जीवात्मा संवेदनशील असतो. ज्ञानेन्द्रियांपासून निर्माण होणार्‍या संवेदना अथवा सिग्नल मनाच्या द्वारे चित्तांत व पुढे जीवात्म्याकडे पोचतात. जीवात्मा त्या संवेदना ग्रहण करण्याच्या अवस्थेत असतो. मनाशी (अंत:करण चातुष्ट्याशी) जोडलेला असतो. ह्यालाच जीवात्मा मनांत वास करून असतो असं म्हणतात. ह्या संवेदनांच्या द्वारे विविध विषयांचे सेवन जिवात्मा करतो. विषयांचा आस्वाद घेत आनंद मिळवतो. स्थिती परिस्थिती संबंधी माहिती अथवा ज्ञान मिळवतो. अंत:करण प्रभाग (मन बुध्दी चित्त अहंकार) ही जिवत्म्याची टूल्स आहेत. त्यांचा वापर जिवात्मा करतो आणि विविध विषयांचा आस्वाद घेतो.

स्वप्न अवस्था:     ह्या अवस्थेत स्थूल देह विश्राम अवस्थेत असतो. स्थिर असतो. त्याच्या देहाच्या स्वयंचलित (ऑटोमॅटिक चालणार्‍या) यंत्रणा चालूच असतात. प्रत्येकाच्या स्वतंत्र प्रोग्रॅम प्रमाणे चालूच असतात. डोळ्यांची झापडे बंद असतात. त्यामुळे दृष्याच्या संवेदना निर्माणच होत नाहीत. इतर ज्ञानेन्द्रियां बरोबर जोडलेल्या अवयवांचे संवेदना निर्मितीचे कार्य बंदच असते. एकूण, ज्ञानेन्द्रियांशी जोडलेले स्थूलदेहाचे अवयव कार्यरत नसतात. ज्ञानेन्द्रिये आणि अंत:करण यामधील डेटा लिंकचे काम बंद होते. डेटा लिंक स्विच ऑफ होतो. परंतु अंत:करणाचे जीवात्म्याबरोबरचे संदेश वहनाचे कार्य चालूच असते. कारणदेहावरून अतृप्त ईषणा, इच्छा, वासना यांच्या आधारे तसेच प्रारब्धाच्या टाईमटेबल नुसार प्रेरणा निर्मितीचे कार्य चालूच असते. कारणदेह निर्माण झालेली प्रत्येक प्रेरणा, चित्ताकडे प्रक्षेपित करीतच असतो. चित्त विचारप्रक्रिया करून मनाकडे आज्ञावली पाठवतच असतो. पुढचा स्थूलदेहाचा रस्ता बंद असल्याने मनात सर्व आज्ञांची गर्दी होते. ह्या विचारांच्या गर्दी मधून एखादे कल्पना चित्र निर्माण करून ते जीवात्म्याला दाखवले जाते.त्यासंबंधी विचार संवेदना जीवत्म्याकडे पाठवल्या जातात. जीवात्मा तेच व्हर्चुअल चित्र बघतो.व कल्पनाविलास करतो. ह्यालाच स्वप्न अवस्था म्हणतात. हीच चित्रे मन:चक्षूंना दिसतात.

सुषुप्त अवस्था:    अथवा निद्रावस्था. म्हणजे जाणिवेचा अभाव. ह्या अवस्थेत जीवात्म्याने अंत:करणाबरोबरचा संपर्क संबंध ऑफ केलेला असतो. त्यामुळे कुठल्याही संवेदना, कुठलेही संदेश मनाकडून जीवात्म्यापर्यंत पोचत नाहीत. देहासंबंधी कसलिच जाणीव जीवात्म्याला नसते. म्हणूनच या अवस्थेला नेणीव असे देखील म्हणतात. जीवात्मा हृदयआकाशांत असतो. तेथूनच तो देहयंत्रणा नियंत्रित करतो. हृदयआकाश म्हणजे केन्द्रीय नियंत्रण कक्ष. तेथूनच जीवात्मा हे ऑन/ऑफचे खेळ खेळत असतो. व स्वत:ला हव्या असलेल्या अवस्थेत जाऊ शकतो. जीवात्मा जर शरीर थकल्याने सुषुप्त अवस्थेत प्रवेश करेल तर ती झोप झाली. ही अवस्था अज्ञानाने युक्त असते. परंतु ज्ञानाने युक्त जीवात्मा जेव्हां जाणीवपूर्वक सुषुप्त अवस्थेत जातो, त्यावेळेस ती योगनिद्रा होते.

तूरीया अवस्था :    ही अवस्था वरील तीन अवस्थांच्या पलिकडील अवस्था आहे. या अवस्थेत जीवात्मा या तीन्ही अवस्था त्रयस्थाच्या भूमिकेतून साक्षिदाराच्या भूमिकेतून साक्षित्वाने बघतो. सामान्यत: जीवात्मा कधी इंद्रियाच्या कडून आलेल्या संवेदना ग्रहण करीत विषय सेवन करतो, तर कधी चित्तात होणार्‍या विचारप्रक्रियां मधे रस घेतो. अशा प्रकारे त्रिदेहात घडणार्‍या घटनांमधे रममाण असतो. त्यांच्यात आसक्त असतो. अडकलेला असतो. जेव्हां जीवात्मा ह्यातून इंटरेस्ट काढून घेऊन चाललेला खेळ त्रयस्थाप्रमाणे बघतो, त्याचे निरीक्षण करतो, तेव्हां त्या अवस्थेला तूरिया अवस्था म्हणतात. नदीच्या प्रवाहातून बाहेर काठावर येऊन प्रवाहाचे निरीक्षण करण्या सारखेच आहे. प्रवाहात प्रवाहित होताना प्रवाहाचे वास्तव कक्षांत येत नाही. परंतु प्रवाहाचे निरीक्षण , प्रवाहाचा अभ्यास, काठावरूनच करता येतो. जीवत्मा बाहेरून संवेदनांच्या प्रवाहाचे निरीक्षण करतो, त्यावेळेस तो तूरीया अवस्थेत असतो. तूरीया अवस्था प्राप्त झाल्यावर तूरीया अवस्था अखंड 24 तास रहाते. थोड्या वेळा पुरती नसते. या अवस्थेतून आंत बाहेर करता येत नाही. तूरीया अवस्थेत माणूस स्वत:च स्वत:ला न्याहाळित असतो. प्रारब्ध प्रवाहानुसार जीवन नाट्य चालूच असते. कुठल्याही प्रकारच्या संवेदनांचा परिणाम त्याच्यावर होत नाही. केवळ अंत:प्रेरणेद्वारे शरीर कार्य करित असते. जीवात्मा आसक्त न होता, घडणार्‍या प्रक्रियेचे निरीक्षण करून मूल्यांकन करतो. ऑनगोईंग अखंड परीक्षण चालू असतं. त्यामुळे त्याच्याकडून प्रमाद होऊच शकत नाही. प्रमाद होण्यासाठी अहंकार लागतो. सहभाग लागतो. तीन्ही अवस्थांपासून वेगळे झाल्याने आसक्ती तसेच अहंकार यांची बाधा होऊच शकत नाही. दोष केवळ अहंकार आणि आसक्तीनेच निर्माण होतो. भगवद्गीतेत सागितलेली स्थितप्रज्ञाची लक्षणं ही तूरीया अवस्थेतील भक्ताचीच लक्षणं आहेत. स्वामी समर्थांनी प्रबोधित केलेल्या ” ईक्षण परीक्षणसे मूल्यांकन ” या विषया वरील प्रबोधनांत तूरिया अवस्थे बद्दल सखोल ज्ञान सांगितले आहे.

उन्मनी अवस्था:      उन्मनी ही तूरीया अवस्थेत प्रवेश करतानच्या वेळची मधली अवस्था आहे. ट्रान्झीशन फेज आहे. तूरीया अवस्थेच्या काठावरची आंत बाहेर अशी दोलायमान अवस्था आहे. तूरीया अवस्थेत स्थिर झाल्यावर, तूरीया अवस्था अखंड रहाते.

!! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराजकी जय !!

Scroll to Top