!!श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ!!
ऐका
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ प्रबोधित ” शिवगुरु तत्वरहस्य ” या विषया संबंधी प्रबोधनांच्या आधारे हा लेख लिहिला गेला.
विषय प्रत्येक भक्तासाठीं महत्वाचा आहे. आषाढ पौर्णिमा हा सदगुरूंचा दिवस. भक्तगण दरवर्षीं उत्साहाने साजरा करतात. सदगुरूंचे पूजन अर्चन करून त्यांच्या प्रति स्वत:ची श्रध्दा सद्भावना कृतज्ञता प्रेमभाव भक्तिभाव शरणभाव समर्पणभाव प्रत्येक भक्त व्यक्त करतो. परंतु बऱयाच भक्तांना सद्गुरू म्हणजे नक्की कोण? तसेच सदगुरू या संकल्पनेशी संलग्न असलेल्या विषयांबद्दल नीटशी सुस्पष्ट माहिती नसते. सदगुरूंची ओळख, एक स्पेशल आगळी वेगळी महान व्यक्ती, एवढीच असते. त्यापलिकडे संभ्रमच असतो. स्वामींनी भक्तांचे हे अज्ञान दूर करून त्यासंबंधी माहिती, ज्ञान, आजवर सर्वसामान्यांना गूढ वाटणारी अनेक तत्व रहस्ये आपल्या संचारवाणी द्वारे समजाऊन सांगितली आहेत. ते ज्ञान संक्षिप्त स्वरूपात सहज समजेल अशा सोप्या भाषेत वाचकांच्या पुढे चितनार्थ मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प स्वामी कृपाआशिर्वादाच्या जोरावर करीत आहे. स्वामीच माझ्या देहाच्या माध्यमातून ज्ञान प्रगट करतील हा विश्वास दृढ आहे. माझा स्वत:चा सहभाग शून्यच.
जीवभावाच्या प्रभावाने मनुष्य आपल्या सद्गुरूंना एक व्यक्तीच समजतो. दृष्य स्वरूपांत मनुष्यदेहच दिसत असल्याने एक मनुष्यच समजतो. त्यामुळे त्याचा सद्गुरूंचा अनुभव केवळ मनुष्यत्वाचाच असतो. दिव्यत्वाचा नसतो. त्या अनुभवानुसारच भक्त त्यांच्या बरोबर व्यवहार करतो. त्यांच्या सोबत चर्चा वादविवाद करतो. त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी करण्यासाठी स्वत:च्या तर्कबुध्दीची क्षमता प्रदर्शित करतो. केवळ चर्चा तसेच वादविवादच सिध्द करतो. स्वत:ची विद्वत्ताच प्रदर्शित करतो. अशा लोकांना ह्या प्रवृत्तीमुळे सद्गुरूंपासून ज्ञान प्राप्ती होत नाही. केवळ चर्चा वादांतच वेळेचा अपव्यय होतो व ज्ञानाची सिध्दता राहूनच जाते. ह्या प्रवृत्तीतून कळत नकळत प्रमाद घडण्याची दाट संभावना असतेच.
सदगुरू स्वत: गुरुतत्वाने ओतप्रोत भरलेले असतात. बाह्य दर्शन मनुष्यदेहाचं होतं. बाह्य दर्शन पंचमहाभूतात्मक अन्नमय कोषाचे होते. परंतु अंतरंगात गुरुतत्व ठासून भरलेले असते. गुरुभक्ताची भक्ती, प्रेम, श्रध्दा, विश्वास, प्रेमभाव, भक्तिभाव, समर्पण भाव, जस जसा प्रगल्भ होईल, तस तसं सदगुरूंच्या मनुष्यदेहांतच गुरुतत्वाचं दर्शन जास्त जास्त स्पष्ट होत जातं. गुरुभावामुळेच गुरुतत्वाची अनुभुती सिध्द होते. श्रध्देने मनुष्याचे अंत:करण हळू हळू पवित्र होते. पवित्र अंत:करणातील श्रध्देमुळेच गुरुभाव सिध्द होतो. श्रध्दे मुळेच ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता सिध्द होते. जर संपूर्ण ज्ञान प्राप्त करण्याची अभिलाषा असेल, तर सदगुरूं प्रति संपूर्ण शरणभाव, संपूर्ण समर्पणभाव असणे अनिवार्य आहे. भक्त भले सदगुरूंचा मनुष्यदेह बघत असेल. परंतु अंत:करणा द्वारा गुरुतत्वाच्या दर्शनाचीच भावना जागृत हवी. सदगुरूंच्या मनुष्यदेहांत त्रिगुणात्मक त्रैमूर्ती ओतप्रोत सिध्द आहेत. हे लक्षांत ठेवा. ब्रह्मा विष्णू महेश्वर आपलं दिव्य कार्य प्रस्तुत सदगुरूंच्या देहाद्वारे अखंड अविरत करतात.
सदगुरूंचे स्वत:चे आचरण, वागणूक, चालणे बोलणे यांत सहजता तसेच स्वाभाविकता सिध्द असते. ह्या सहज वागणुकीच्या माध्यमातून सदगुरू अखंड अविरत ज्ञान प्रदान करीत असतात. ऊर्जा प्रक्षेपित करतात. सहज बोलणे हाचि उपदेश. सदगुरू सहज , स्वाभाविकतेने जे बोलतात त्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक वाक्यात ज्ञान ठासून भरलेले असते. स्वाभाविक वागणुकीतूनच ज्ञान प्रबोधन अखंड होत असते. सदगुरूंचे तत्वस्वरूप, गुरुतत्वाचे अधिष्ठान स्वीकृत केल्यावरच प्रस्तुत सदगुरूंपासून ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता भक्त विकसित करू शकेल.
गुरुतत्वाची विशेषता समजून घेऊ. गुरुतत्व करुणेचा सागर आहे. गुरुतत्व वात्सल्याने ओतप्रोत आहे. आसक्ती मुळे जीव प्रारब्धवश असंख्य बंधनांच्या कोषांत, जाळ्यांत गुरफटलेला असतो. कृपासागर, क्षमासागर, दयासागर, वात्सल्याने ओतप्रोत असलेले गुरुतत्व सदगुरूंच्या रुपाने परमेश्वरप्राप्ती, स्वामी प्राप्तीची तीव्र इच्छा असलेल्या भक्तांचे प्रारब्धभोग स्वत:वर ओढवून घेतात. स्वत: भोगून संपवतात. परंतु भक्ताला वात्सल्याने सांभाळत, रक्षण संरक्षण प्रदान करीत, सुपंथाचे मार्गदर्शन करतात.
सदगुरूं च्या अधिष्ठान स्थानी असलेला गुरुतत्वाची स्वीकृती केली, सदगुरूंची दिव्य सेवा केली, सदगुरुंचा कृपाप्रसाद प्राप्त करण्याच्या उद्देशाने स्वत:चा प्रेमभाव, दिव्य शरणभाव, दिव्य समर्पणभाव प्रस्थापित केला. असा दुर्लभ भक्तच सदगुरुंच्यादेहात अधिष्ठित प्रतिष्ठित असलेल्या गुरुतत्वाला जाणू शकेल. गुरुतत्वाची प्रचीती घेऊ शकेल.
प्रस्तुत गुरुतत्व ज्ञानस्वरूप आहे. गुरुतत्वच समग्र जीवांच्या अज्ञानाचा ऱहास करते. गुरुतत्वच समग्र भ्रम नष्ट करते. प्रत्येक जीवाचा कल्याण पथ सुस्पष्ट करते.
सदगुरूंच्या कृपास्पर्शाने भक्तामधे सुप्त अवस्थेतील सर्व प्रकारच्या शक्ती जागृत होतात. सदगुरूंच्या संवादाने भक्ताचे समग्र ज्ञानतंतू जागृत होतात. अशा प्रकारे सदगुरूंनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य अशा दिव्य भक्तांना समग्र ज्ञान सिध्द करण्याच्या प्रक्रियेत सहाय्यभूत ठरते. ह्याच कारणास्तव जेव्हां असा दिव्य भक्त आपल्या सदगरुंना बघतो. सदगुरुंना वंदन करतो, तेव्हां भक्ताला आपल्या सदगुरूमध्ये स्वामीतत्व तसेच गुरुतत्वाच्या अस्तित्वाचि दिव्य प्रचीती प्राप्त होते. त्याच्या अज्ञानाचा संपूर्ण नाश होतो. त्याचा भ्रम नष्ट होतो.
सदगुरू मनुष्यदेहाने कार्य करताना दिसत असले तरी, प्रत्यक्षांत अधिष्ठानातील गुरुतत्वच मनुष्यदेहाद्वारे कार्य करून घेत असते.
आता आणखी सुक्ष्म पातळीवरील सिध्दांत चिंतनार्थ माडतो.
प्रत्येक जीवाच्या, प्रत्येक भक्ताच्या देहाच्या अधिष्ठानाच्या जागीं हृदयआकाश या स्थानात जीवात्म्या शेजारी सोबतीला परब्रह्म परमेश्वराचे सुप्त वास्तव्य असते. ह्या परमेश्वराच्या अस्तित्वाला सदगुरूतत्व अथवा गुरुतत्व म्हणतात. मनुष्यदेहधारी सदगुरूंच्या देहाच्या अधिष्ठानातील गुरुतत्व जागृत झालेले असते. त्यांच्या शरीराच्या प्रत्येक पेशि पेशि च्या केन्द्रस्थानी असलेले गुरुतत्व जागृत असते. कार्यरत असते. सोप्या शब्दांत मनुष्यदेहधारी सद्गुरूंच्या देहांत प्रत्येक कणाकणात प्रत्येक अणुरेणूत ठासून भरलेले गुरुतत्व जागृत अवस्थेत आढळते.
सदगुरूंच्या तत्वस्वरूपातील गुरुतत्वाच्या अस्तित्वाची जाणीव होऊन सदगुरूंच्या तत्वस्वरूप अस्तित्वाचा मनोमन स्वीकार केल्यावर मनुष्य अज्ञान संपूर्णपणे नष्ट करण्यास व ज्ञान सिध्द करण्यास सक्षम होतो.
सदगुरूंचे अंत:करणात दया तडुंब भरलेली असल्याकारणाने त्याच्या वर्तणुकीत सदैव पाझरत असते. दयासागर सदगुरू सर्वप्रथम प्रत्येक भक्ताला त्याच्या मनोकामना पूर्ण करण्याच्या संधी आपणहून प्रदान करतात. भक्ताला चुकीच्या दिशेने प्रयत्न होत असल्याची जाणीव, चुकीच्या समजूतींची जाणीव,उपरती, पश्चात्ताप होण्याच्या, अनुताप होण्याच्या उद्देशाने परत परत संधी प्रदान करतात. होत असलेल्या चुकीची जाणीव होऊन पश्चात्ताप तसेच अनुतापाने पोळलेल्या भक्ताच्याच अंत:करणात विवेक तथा वैराग्य निर्माण होण्याची तसेच टिकण्याची शक्यता असते.
अशा अनुतप्त भक्ताला गुरुतत्व सदगुरूंच्या माध्यमातून कृपाआशिर्वाद प्रदान करतात. भक्ताच्या अंत:करणांत सदगरुंच्या प्रति अनन्यशरणभाव तसेच संपूर्ण समर्पणभाव निर्माण झाल्यावर भक्त क़ृपाआशिर्वचनाची ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता विकसित करू शकतो. ह्या ऊर्जेच्या प्रभावाने विवेक वैराग्य प्रस्तापित होतात. अनुतप्त जीवच विवेक आणि वैराग्य सिध्द करू शकतो. विवेक वैराग्य सिध्द झाल्यावर ज्ञान प्राप्तीची प्रक्रिया सुरू होऊन पुढचा मार्ग खुला होतो. वैराग्यापासून अंत: प्रेरणा, अंत: प्रेरणेपासून प्रज्ञा, प्रज्ञे द्वारे ज्ञान प्राप्ती असा सोपान सुस्पष्ट होतो. हृदयस्थ सदगुरुतत्व अंत:प्रेरणेच्या द्वारे ज्ञान प्रक्षेपित करतात. ज्ञान बाहेरून आंत येत नाही. आंतूनच ज्ञानगंगा अंत:करणांत अखंड स्त्रवते. आणि प्रतिष्ठित होते. दयासागर, ज्ञानस्वरूप सद्गुरू अशाप्रकारे भक्ताला ज्ञान प्रदान करून, ज्ञानस्वरूप करतात. ज्ञानरश्मींच्या प्रभावाने, ज्ञानगंगेच्या प्रवाहामुळे, भक्ताच्या अज्ञानाचा समूळ नाश आपोआपच होतो. अज्ञाना बरोबरच, भ्रमाचा देखील नाश होतो. भ्रमाबरोबरच मायातत्वाचा प्रभाव देखील विरून जातो.
अज्ञान तिमिराचा नाश करून भक्ताला ज्ञानस्वरूप सिध्द करणे हीच सदगुरू कृपेची लीला आहे.
आता आणखी सूक्ष्म पातळीवरील ज्ञानसिध्दांत चिंतनार्थ मांडतो.
हृदयाचं स्पंदन कसं होतं? दमलागल्यावर हृदयस्पंदनाचा वेग कसा वाढतो? स्पंदित होताना हृदयाला जोडलेले असंख्य स्नायू ठराविक क्रमाने आकुचन प्रसरण पावतात. प्रत्येक स्नायूचा आकुचन प्रसरणाचा समन्वयक्रम ठरलेला असतो. जन्मापसून ते मृत्यू पर्यंत हृदयाचे कार्य अखंड चालूच असते. ठरलेल्या समन्वयक्रमाने हृदयाचे स्नायू सदैव कार्य करतात. हा समन्वक्रम म्हणजेच हृदयाच्या कार्याचे सखोल ज्ञान. हृदयस्पंदन ही समन्वयाच्या ज्ञानावर अधिष्ठित प्रक्रिया आहे. देहाच्या नियंत्रण संस्थांपैकी प्रत्येक संस्था, त्याच्या विशेष सुनिश्चित समन्वयज्ञानावर आधारित कार्य करते. अशा समन्वयज्ञानाच्या नोंदणीलाच आजच्या युगांत प्रोग्राम म्हणतात. आणखीन सूक्ष्म विचार केला तर शरीराची प्रत्येक पेशि ही एक स्वतंत्र कार्य संस्था आहे. प्रत्येक पेशीची कार्यप्रणाली सुनिश्चित आहे. प्रत्येक पेशीचे कार्यसमन्वयाचे ज्ञान , म्हणजे प्रोग्राम, त्या त्या पेशीतच दडलेला आहे. ह्याच ज्ञानाच्या आधारे प्रत्येक पेशी स्वतंत्रपणे कार्य करते. असे असंख्य ज्ञानाचे अंश शरीरांत दडलेले आहेत. ह्या ज्ञानाच्या आधारे शरीर यंत्रणा कार्य करते. प्रत्येक स्नायू अशा असंख्य पेशींपासूनच बनलेला आहे. शरिरांत वेगवेगळ्या विभागांत कार्य करणाऱया अगणित पेशी आहेत. तसेच सूक्ष्म देहाचे आणि कारणदेहाचे कार्य सुध्दा अशा ज्ञान अंशांच्या आधारेच चालते. कारणदेहाच्या कार्याचा परिणाम सुक्ष्म देहावर होतो. सूक्ष्मदेहाच्या नियंत्रण कार्याच्या परिणामस्वरूप स्थूल देहाचे अवयव कार्य करतात. ही सगळी प्रक्रिया ज्ञानावर आधारित स्वयंचलित प्रक्रिया असते. हा मनुष्यदेहाच्या पातळीवरील विचार बघितला. जगताच्या पातळीवर विचारकेल्यास एक एक देह, एक एक जीव म्हणजेच जगताची एक एक पेशि. अशा अगणित जीवांचे अस्तित्व जगतात मोडते. जगताच्या सर्व जिवांचे, तसेच निर्जीव वस्तूंचे नियंत्रण करणारी व्यवस्था सुध्दा पूर्वनिर्धारित कार्यप्रणालीच्या ज्ञानाच्या प्रोग्रामवर आधारित ऑटोमॅटिक चालते. जगताची/ ब्रह्मांडाची व्यवस्था सुध्दां ज्ञानाच्या आधारे, ज्ञानाच्या अधिष्ठानावरच चालते. ज्ञानाची व्याप्ती कशी सर्वत्र सर्वदूर पसेलेली आहे हे लक्षांत आलेच असेल. जिथे ज्ञानाचा संबंध आला तिथे गुरुतत्वाचे तत्वरूप अस्तित्व आहेच. गुरुतत्व ज्ञानस्वरूपच आहे. गुरुतत्व सुध्दां सर्वत्र सर्वव्याप्त आहे. सूक्ष्मात् अतिसूक्ष्म पातळीपासून ते विशालात् अतिविशाल पातळी पर्यंत गुरुतत्वाची व्याप्ती आहे. हेच गुरुतत्व सदगुरुंच्यादेहांत प्रकर्शाने अभिव्यक्त होते.
भ्रमवश, अज्ञानवश जीवात्मा जागृत अवस्थेत स्वत:चे भिन्न अस्तित्व गृहीत धरतो. राग द्वेश, अभिनिवेश अहंकार यांच्या जोरावर ह्या देहाशी संबंधित सगळ्या ज्ञानाधिष्ठित बाह्य कृती, स्वत:च केलेल्या आहेत असे समजतो. प्रत्येक कृतिचा कर्ता धर्ता भोक्ता स्वत:लाच समजतो. त्यामुळे नैसर्गिक प्रक्रियेच्या प्रोग्राम मधे सहभागी होऊन स्वत:च त्या प्रक्रियेचा भाग बनतो. वस्तुत: देहाची कृती पूर्वनियोजित सिध्द ज्ञानाच्या आधारे ऑटोमॅटिक चालू असते. परंतु अज्ञानवश जीवात्मा कर्ता भोक्ता झाल्यामुळे त्या ऑटोमॅटिक प्रक्रियेच्या खेळात सहभागी होतो. जीवात्म्याची ही करणी म्हणजे अविद्येचे अज्ञानाचेच दर्शन आहे. परिणाम स्वरूप जीवात्मा ह्या अज्ञानाच्या आवरणाखालीच स्वत:चे जीवन व्यतित करतो.
परिणामस्वरूप प्रत्येक शुभकार्याच्या संकल्पात, अनेक अडथळे अडचणी पूर्व कर्मार्जित प्रारब्धवश निर्माण होतात. ह्या प्राकृतिक प्रक्रियेच्या खेळाच्या नियमानुसार प्रत्येकाचे प्रारब्ध ठरवले जाते. मनुष्य प्राकृतिक प्रक्रियेच्या रहाट गाड्यात ओढला जातो. अशा अवस्थेत स्वत:ची सोडवणूक करणे, मुक्ती मिळवणे अशक्यप्राय होते.
सूक्ष्म पातळी झाली. आता सुक्ष्मतर पातळीवरील विचार मांडतो.
गुरुतत्वाची पार्श्वभूमी शिवतत्व आहे. गुरुतत्व आणि शिवतत्व एकाच तत्वाची नांवे आहेत. स्वामींचे तत्वस्वरूप गुरुतत्वच आहे. शिवतत्वाची समग्र लक्षणे गुरुतत्वात आहेत. स्वामी समर्थ शिवतत्वाच्या सर्व लक्षणांनी युक्त आहेत.
नीट लक्षांत घ्या. मूळ, परब्रह्म परमेश्वर स्वरूप शिवतत्व अथवा शिव शंभो. शिवशंभो स्वत: आदिगुरु; आदिनाथ; जगदगुरू आहेत. त्यांच्या पासून सगळ्या गुरुशिष्य परंपरा सुरु झाल्या. गुरुतत्वाच्या पार्श्वभूमीत शिवतत्वच कार्य करते. गुरुतत्व म्हणजेच शिवतत्व. शिवतत्व म्हणजेच गुरुतत्व.
ब्रह्मा विष्णू महेश्वर स्वरूपी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्तप्रभु स्वयंभू शिवतत्वाचाच दिव्य गुरुत्वाचा आविष्कार आहेत. स्वयंभू शिवतत्वच ब्रह्मा विष्णू महेश्वर त्रिगुणात्मक त्रैमूर्तींचे मूळ अधिष्ठान आहे.
स्वामी समर्थांचे तत्वस्वरूप गुरुतत्वच आहे. स्वामीतत्व गुरुतत्व आणि शिवतत्व अभिन्न आहेत.
ह्या सिध्दांताच्या दृष्टिकोनातून स्वामी समर्थाच्या चरित्राचे, लीलांचे अध्ययन केल्यास निदर्शनास येईल की स्वामींच्या प्रत्येक लीलाप्रसंगातील स्वामींचे वागणे, स्वामींचे आचरण, स्वामींचे बोलणे चालणे, स्वामींचे भस्म धारण करणे, स्वामींची दिगंबर अवस्था, स्वामींची अवधूत स्थिती, स्वामींची कृपादृष्टी, स्वामींची साम्यदृष्टी, समग्र जीवमात्रांचे कल्याण करण्यासाठी सदैव कार्यरत राहाण्याची प्रवृत्ती, स्वामींनी त्यांच्या असंख्य भक्तांना ज्ञानस्वरूप केले, ही शिवतत्वाचीच लक्षणे आहेत. या वरून असाच निष्कर्ष निघतो की स्वामीतत्व, गुरुतत्व आणि शिवतत्व तीन्ही अभिन्न आहेत. एकच आहेत.
आता पुढे सुक्ष्मतम पातळीवर जाऊ. शिवतत्वाबद्दल जाणून घेऊ.
शिवतत्व आणि शक्तितत्व एकच आहेत. शक्तितत्व हा शिवतत्वाचा आविष्कार आहे.
जेव्हां शिवतत्वाच्या अधिष्ठानतत्वाचे ध्यान होते तेव्हां शिवतत्वाचे दर्शन होते. जेव्हां शिवतत्वाच्या आविष्काराचे ध्यान होते, त्यावेळेस शिवाच्या शक्तितत्वाचा आविष्कार होतो.
सदगुरु जेव्हां स्वत: ध्यानस्थ होतात, तेव्हां समग्र जगत, समग्र ब्रह्मांड यांच्यापासून निवृत्त होऊन शिवस्वरूप होतात. तसेच शिवस्वरूप सदगुरू जेव्हां भक्तवत्सल होतात, तेव्हां आपल्या भक्तांसमोर शिष्यगणांसमोर लीला विग्रह करतात. कृपा आशीर्वचनाचा पर्जन्यवत् वर्षाव करतात. त्यानंतर सदगुरूंचा दिव्य आविष्कार हा शक्तिचाच आविष्कार असतो. हिच चित् शक्ति. हीच शिवशक्ति. शक्ति आणि शिव अभिन्न असल्यामुळे शक्तिच्या माध्यमातून होणारा शिवतत्वाचा दिव्य आविष्कार आहे.
सदगुरूंचे अधिष्ठान गुरुतत्व, शिवतत्वच आहे. सदगुरूंचे अधिष्ठान शिवतत्वाने ओतप्रोत आहे.
मनुष्यदेहधारी गुरुपदस्थ दुर्लभ महात्मा अपल्या सत्शिष्याला अनुग्रह प्रदान करताना स्वत:च्या नेत्रांच्या द्वारे अनुग्रह शक्ति प्रदान करतात. शक्तीचे संचलन सिध्द करतात. प्रस्तुत शक्तिसंक्रमण, शक्तीचा दिव्य आविष्कार शिवशक्तीचाच दिव्य आविष्कार आहे. शक्ति संक्रमणाच्या परिणामाने प्रस्तुत अनुग्रहित मनुष्याच्या सर्व शरीर पेशीं मधील समग्र अणुरेणू परिवर्तित होतात. संपूर्ण शरीरांत शिवतत्वाचे अधिष्ठान सिध्द होते. असा शक्तीचा दिव्य अनुभव मनुष्याला आवष्य प्राप्त होतो.
अशाप्रकारे शिवतत्वाच्या दिव्य प्रभावामुळे जेव्हां मनुष्यदेहधारी जीवात्मा स्वत: गुरुपदावर आरूढ होतो, त्यावेळेस शिव तसेच शिवशक्तीचे दर्शन प्रदर्शन अनुग्रहाच्या प्रक्रियेत आपण हून सिध्द होते. अशा सर्व अनुग्रहित शिष्यांनी लक्षांत ठेवावे की त्यांना अखंड अविरत शिवशंभोंची आराधना सिध्द करायची आहे.
ज्याला उपरती झाली, केलल्या कृत्यांचा पश्चात्ताप झाला, ज्याला जीज्ञासा प्राप्त झाली, ज्ञानप्राप्तीची जिज्ञासा प्राप्त झाली, ज्याच्या अंत:करणांत समग्र अज्ञानापसून मुक्ती मिळवण्याची अभिलाषा सिध्द झाली, असा दुर्लभ मनुष्य शिवशंभोंच्या दिव्य कृपेद्वारा आवष्य अनुग्रह प्राप्त करू शकतो. कल्याणपथ स्पष्टपणे प्राप्त करू शकतो. प्रस्तुत मनुष्यदेहांतच तशी संभावना आहे.
ज्या क्षणीं भक्ताला उपरती झाली, पश्चात्ताप झाला, तीव्र जिज्ञासा, ब्रह्म जिज्ञासा सिध्द झाल्यावर त्याक्षणीं अशा दुर्लभ भक्ताला दिव्य पथ निर्देश करण्यासाठीच मी स्वत: सिध्द आहे. असे स्वामी समर्थ वारंवार सांगतात.
अशाप्रकारे शिवतत्वच गुरुतत्व आहे. गुरुतत्वच शिवतत्व आहे. सदगुरूंचे अधिष्ठान गुरुतत्व तसेच शिवतत्व आहे. हा मूलभूत सिध्दांत नीट लक्षांत ठेवा.
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादि लक्ष्यं।
एकं नित्यं विमलं अचलं सर्व धी: साक्षीभूतं।
भावातीतं त्रिगुण रहितं सद्गुरूं तम् नमामि।।
गुरु: ब्रह्मा गुरु: विष्णू गुरु: देवो महेश्वर:। गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै: श्री गुरवे नम:।।
भेटिलागी जीवा लागलीसे आंस। पाहे रात्रंदिवस वाटतुझी। हि विनंती स्वामी समर्थांच्या चरणीं सादर करून
स्वामी समर्थ प्रेरित, त्यांनीच संपन्नकेलेली गुरुसेवा त्यांच्याच चरणीं समर्पित करतो.
शुभं भवतु। शुभं भवतु। शुभं भवतु।