मनुष्याची आजची मानसिकता

!!श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ!!

Read PDF & Download

मानसिक अशांती ही आजची ज्वलंत समस्या बर्‍याच जणांना भेडसावत आहे. त्या मागची कारणे असंख्य आहेत. प्रत्येक व्यक्तीगणिक वेगवेगळी आहेत. चिंतन करूया.

मनुष्याला मन:शांतीचा अभाव आजकाल प्रकर्षाने जाणवत आहे. शांत प्रशांत अवस्था दुर्लभ झालेली आहे. मनुष्य आपल्या कामात गुरफटत जाऊन व्यग्र झाला आहे. काम करताना तो अत्यंत अधीर, अशांत, अस्वस्थ आहे. भूतकाळांत घडलेल्या घटना, क्लेश, दु:ख परत परत आठवून, तो अधिकच त्रस्त होतो. वर्तमान काळात कार्य करताना अत्यंत अशांत, अस्वस्थ आणि अधिर झाल्यामुळे त्याचे शरीर स्वास्थ्य बिघडते. बऱयाच वेळा शांतपणे झोप ही लागत नाही. सुयोग्य वेळेवर झोप येणे तसेच सुयोग्य वेळेवर जाग येणे अशक्यच झाले आहे. जागेपणीं आपण जे कार्य करतो त्याचा हेतू काय? त्याचे नियोजन कसे करावे?  ह्याची योग्य निश्चित माहिती नाही. त्यासंबंधीचे ज्ञान नाही. मनुष्य केवळ आपली उपजीविका साध्य करण्याच्या हेतूने, आपला निर्वाह करण्याच्या हेतूनेच, कुठलीतरी नोकरी वा कोणाचीतरी चाकरी करीत असतो, अथवा स्वतंत्र व्यवसाय करतो, परंतु प्रत्येक कार्यात  एकाग्रता, सुनिश्चित दिशा, सुनिश्चित कार्यप्रणाली, सुनिश्चित जीवनप्रणाली, सुनिश्चित आचरणप्रणाली, सगळ्याचा अभाव आहे. दिवसेंदिवस कार्यप्रणाली बदलते आहे. एवढ्या दिवसात आचारप्रणाली, अथवा वागणूक या संबंधीचे मानक, स्टँडर्ड, अजून नक्की ठरवलेलेच नाही. मनांत अस्वस्थता, अनिश्चितता, अधीरता असल्याने मनुष्य स्वत:च्या आचरणात सारखे बदल करीत असतो.   आचरणात ज्ञानाचा प्रभाव दिसत नाही. मनुष्याच्या जीवनात सुनिश्चित आचरणप्रणाली, जीवनाचा उद्देश, जीवनाची सुनिश्चित दिशा यांचा अभावच आढळतो. आचरणातील अस्थिरतेचा प्रभाव, मनुष्याच्या अंत:करणावर दिवसेंदिवस अधिकाधिक वाढतो आहे. निश्चयात्मक बुध्दीची, निर्णय क्षमतेची तसेच घेतलेल्या निर्णया बाबत पूर्णविश्वासाची कमतरता प्रकर्षाने जाणवते. विचार अखंड बदलत असतात. त्यामुळे संभ्रमच निर्माण होतो. ज्ञानाचे अधिष्ठान, ज्ञानाचा बेसच, गायब आहे. जीवनाचे उद्दिष्ट, जीवनाचे लक्ष्य, टारगेट, अजून ठरवलेलेच नाही. त्यामुळे दिशाहीन झाला असून, भरकटतो आहे. ह्यामुळेच मनुष्य अशांत आहे. अस्वस्थ आहे. क्षणोक्षणीं जास्तच अतृप्त होत आहे. असमाधानी होत आहे. दिवस उगवतो, दिवस मावळतो. दिवसाच्या शेवटी काय मिळवले? शून्यच. ज्ञान नाही. बुध्दिरंजन नाही.तसेच मनोरंजन देखील नाही. आनंद तर दूरच. अखंड आनंद प्राप्तीसाठी तुमचा कांही प्लॅन आहे का? मनुष्य आपले सर्व जीवन केवळ निर्वाहासाठी वापरतो. जन्माला येतो आणि मरून जातो. पशू पक्षी आपला निर्वाह करतातच ना! त्यांना उद्याची चिंता नसते. ते केवळ वर्तमान काळच जगतात. मनुष्याजवळ बुध्दी आहे, परंतु त्याचा उपयोग चुकीच्या दिशेने होतो आहे. तर्कबुध्दीचा वापर केवळ भूतकाळातील घटनांचे चिंतन करण्यात व्यर्थ जातो. कल्पनाशक्तीचा वापर भविष्यकाळाच्या चिंतेत फुकट जातो. परिणामस्वरूप मनुष्य भयभीत होतो.वर्तमान काळाचे भानच उरत नाही. किंवा त्याबद्दल सतर्कता, जागरूकता देखील नाही.  

बरं एवढं सगळं होऊन सुध्दा, या मानसिक अवस्थेचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधण्याची इच्छाच निर्माण होत नाही. हा मायेचा प्रभाव आहे. हाच भ्रम आहे. मनुष्य दुसर्‍याकडून उपायाची अपेक्षा करतो, परंतु तुमच्या अंत:करणाचा ठाव ठिकाणा तुम्हालाच ठाऊक नाही, तर तो दुसर्‍यास कसा समजणार, आणि त्यावर तो उपाय कसा काय सांगणार? तेव्हां तुम्हाला स्वत:च, स्वत:च्या अंत:करणातील घडामोडींचा अभ्यास केला पाहिजे विविध उपायांचा शोध घेतला पाहिजे आणि स्वत:च स्वत:वर प्रयोग करीत रस्ता शोधला पाहिजे. दुसरा पर्यायच नाही, परंतु हे सगळे कसे जमवायचे? काय करायचे? सर्व कांही अध्यात्म शास्त्र समजावतं. प्रथम ते नीट शिकून घ्या, आणि विनियोग करा. प्रोव्हन टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे यशाची शक्यता बळावतेच.  

!शुभं भवतु! शुभं भवतु! शुभं भवतु!
अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराजकी जय।
Scroll to Top