!!श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ!!
सुयोग्य मानसिकता
मनुष्याच्या संभ्रमित अवस्थे बाबत चिंतन केलं. अध्यात्म शास्त्रात यावर उपचार आहेत हे समजून घेतले. आतां अध्यात्म शिकण्यासंबंधी काही विचार चिंतनासाठी मांडतो.
मनातला गुंता सोडवायचा, तर मनावरच काम केले पाहिजे. तुमच्या मनातील उलाढाली फक्त तुम्हालाच माहिती. तेव्हां तुम्हालाच काम करावे लागणार. मानसिकतेत सुधारणा करणे अत्यावष्यक. गोळ्या खाऊन विचारशक्तीच बधीर करणं हा उपाय नव्हे. ही पळवाट आहे. शिवाय गोळ्यांचे संलग्न दूरगामी दुष्परिणाम भोगावेच लागतात.
संभ्रमित मानसिक अवस्थेपासून सुटका करून घेण्यासाठीं स्वत:लाच कष्ट केले पाहिजेत. तुमच्या मानतील भ्रम, संभ्रम तुम्हालाच नष्ट करायचा आहे. विचारांत स्पष्टता आणण्यासाठीं तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. दुसरा, युक्तीचे चार शब्द सांगेल. परंतु त्यावर स्वत: चिंतन करून, विचार मंथन करून, मनाला वळण तुम्हालाच लावायचे आहे. ते काम तुम्हीच करू शकता. दुसरा कोणीही नाही. मनाला वळण लावण्याचे, मानसिकता घडवण्याचे प्रयत्न तुम्हालाच करावे लागतील. स्वत:च्या मनावर विविध प्रयोग करावे लागतात. मनाची प्रवृत्ती सहजा सहजी वळत नाही. दडपशाही चालत नाही. पेशंटली, नेटाने, न कंटाळता सतत प्रयत्न करावेच लागतात. ह्याला पर्याय नाही.
विचारांची गर्दी कमी करून मगच शिल्लक राहिलेल्या विचार मालिकांचा प्राधान्पाम ठरवता येतो. विचारांचा गुंता सोडवता येतो. विचारांचा गुंता सोडवल्याखेरीज विचारांना दिशा देता येत नाही. विचारांना दिशा देण्यासाठी अध्यात्म ज्ञानविचार वापरले जातात.
सध्या रेडीमेड तसेच इन्सटंट चा जमाना आहे. स्वत:साठी स्वत:च कष्ट करण्याची मानसिकता सामान्यत: नसते. प्रयत्नपूर्वक जोपासावी लागते. आयतं काय, कसं व कुठे मिळेल याचा शोध मनुष्य घेतच असतो. अध्यात्म शास्त्र याला अपवाद नाही. तातडीने परिणाम करणारं अध्यात्म मनुष्य शोधत असतो. यात्रा केली, देवाचं दर्शन घेतलं, देवाला नैवेद्य अर्पण केला, भजन केलं, आरती केली, की तत्काळ जीवनातील समस्या सुटतील. मन शांत होईल. अशीच अपेक्षा मनुष्य ठेवतो. देवाचा प्रसाद ग्रहण केला. देवाला दंडवत घातले. म्हणजे ज्ञान तात्काळ मिळेल अशी मूलभुत समजूत. परंतु अध्यात्म, तसंच देव किंवा सत्पुरूष म्हणजे समस्या सोडवणारं यंत्र नव्हेत. तुमच्याच भावना तुमच्याच मनांतील विचारांवर प्रक्रिया करतात. थोड्या प्रमाणात विचारांचा गुंता सुटल्यासारखे वाटते. बरे वाटते. एवढेच.
रेडीमेडची संवय अर्भक अवस्थे पासूनच लागते. नैसर्गिक प्रक्रियेनुसार अर्भकाला माता दूध पाजते. अर्भकाला फक्त गिळण्याचे कष्ट करावे लागतात. मूल थोडे मोठे झाल्यावर माताच काळजी पोटी लेकराला अन्न भरवते. लेकराला पुढे भरवून घ्यायचीच संवय लागते. आणखी मोठे झाल्यावर माता लेकराला आपल्या हातांनी जेवायला शिकवते. पण मूल भरवण्यासाठी आकांडतांडव करते. ज्ञात असलेले सगळे प्रयोग करते. इमोशनल ब्लॅकमेल करते. परंतु आई मुलाच्या हिताचा विचार करून त्याला आपल्या हाताने जेवायला भाग पाडते. चांगली कडकडीत भूक लागल्यावर भुकेपोटी मूल आपसूक आपल्या हाताने जेवते. हळू हळू जेवते. प्रत्येक घासागणिक हट्ट करते. अर्धवट उपाशी रहाते. पर्याय नाही हे पटल्यावरच मूल आपल्या हाताने जेवायला लागते. भूक लागल्यावर मनुष्य, भूक भागवायला काय मिळेल कुठे मिळेल त्याचा स्वत: शोध घेऊन, प्रयत्नपूर्वक आपली भूक भागवतो.
अध्यात्म या प्रवृत्तीला अपवाद नाही. मनुष्य अध्यात्मज्ञान सुद्धां रेडीमेडच मागतो. मनुष्याची ही प्रवृत्ती ओळखून कित्येक संत सत्पुरूषांनी आपल्या परीने स्वत:ला ज्ञात असलेले ज्ञान संकलित करून पुढील पिढीतील भक्तांसमोर प्रस्तुत केले आहे. मनुष्याला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. अतिप्राचीन काळापासून ही परंपरा चालूच आहे.
वेद, उपनिषदे, श्रीमद् भागवत, श्रीमद् भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, विविध संत वाङमय, तसेच अलिकडच्या काळांत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, इत्यादी असंख्य सत्पुरुषानी निर्माण केलेले वाङमय. अफाट, मोजमाप करता न येण्याएवढे, ज्ञान संकलित केले गेले. अजूनही त्यात भर पडतच आहे. हे सर्व वेगवेगळ्या पध्दतीने मांडलेले ज्ञानविचार अभ्यास करण्यासाठी उपलब्ध आहेतच.
ताट वाढून ठेवले आहे. परंतु इच्छाशक्तीचा अभाव आहे. अभ्यास करण्याची, वैचारक कष्ट करण्याची, इच्छाच नाही. त्यातल्या त्यात सोपा रस्ता मनुष्य स्वीकारतो. देहकष्ट स्वीकारतो. शारिरिक कृतीची संवय असल्याने शारिरिक कृती स्वीकारतो. मानसिक कृतीची संवय नसल्याने, मानसिक कृती कठीण वाटते. ती नाकारतो. तीर्थयात्रा, देवदर्शने, विविध उत्सव, व्रत वैकल्ये, अनुष्ठाने, पूजापाठ इत्यादी प्रयत्न प्रकारांवरच लक्ष केंद्रित करतो. परंतु सुयोग्य मानसिकतेच्या अभावी नुसत्या शारिरिक कृतीचा कांहीच उपयोग नसतो. देव भावाचा भुकेला. शारिरिक कृती बरोबरच भावनेची तसेच विचारांची सांगड पाहिजेच. भावना, विचार आणि शारिरिक कृती यांच्या संयोगानेच कार्यसिध्दी होते. शेवटी मानसिकता महत्वाची. मानसिकतेची सुधारणा डावलून चालणार नाही. समर्थ रामदास स्वामी स्पष्टपणे सांगतात.
बहू हिंडता सौख्य होणार नाही। शिणावे परी नातुडे हीत काही।
विचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।
ज्ञान विचार ग्रहणकरून, अभ्यासाद्वारे आत्मसात् करून, त्या ज्ञान विचारांचे आघात मनावर सतत करून, मनाला वळण लावतात. मनाला सुयोग्य वळण लावणे हाच उपाय प्रभावी ठरतो. सुयोग्य मानसिकता हेच शहाणपणाचे रहस्य आहे. परमेश्वराचे अनुसंधान, परमेश्वराची अखंड आठवण, परमेश्वराचे अखंड स्मरण प्रस्थापित करण्याचे जोरदार प्रयत्न करावे. (विचारे बरे अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।) . हाच रस्ता आहे. सुयोग्य मानसिकता प्रस्थापित करायला प्रचंड अंतर्गत संघर्ष करावा लागतो. मन सहजा सहजी ऐकत नाही.
शिक्षण
हृदयस्थ सद्गुरू सुरुवातीचे चार घास भरवतात. वास्तवाचे ज्ञान करून देतात. मानसिक कोंडीमधून, जन्म-मृत्यूच्या सापळ्यामधून बाहेर पडण्याचा रस्ता कसा सापडेल, कुठे सापडेल ते सुध्दा सागतात. तसेच रस्ता तुझा तुलाच शोधला पाहिजे. रस्ता सापडल्यावर मार्गक्रमण तुलाच केले पाहिजे. एवढे सांगतात. स्वतःच शोध म्हणजे सापडेल. हेच पालूपद लावतात. ज्ञानाची भूक लागेपर्यंत वाट बघतात. भूक लागलीच पाहिजे. उत्कंठा वाढलीच पाहिजे. त्याखेरीज ज्ञान पचणार नाही. ज्ञानाचे महत्व कळणार नाही. सुटकेची तीव्र इच्छा निर्माण होतांच भक्त आपणहून शोधाशोध करू लागतो. सुटकेसंबंधी ज्ञान मिळवण्याचे अटोकाट प्रयत्न करतो. जाणकार व्यक्तींना प्रश्न विचारतो. स्वत:ची जिज्ञासा प्रगट करतो. स्वत: विचार करतो. बद्ध अवस्थेतून जिज्ञासू अवस्थेपर्यत उत्क्रांत होतो. त्यानंतर त्याला काय रुचेल, किती पचेल याचा अंदाज घेत सभोवतालची परिस्थिती बदलत थोडे थोडे ज्ञान त्याच्यासमोर सद्गुरू उलगडतात. तेवढे पचनी पडल्यावर, पचल्याची खात्री पटल्यावर मग पुढील ज्ञान प्रदान होते. सगळेच एकदम पुढ्यात ठेवत नाहींत. तसे झाल्यास हाव सुटून खा खा करील आणि अजीर्ण होईल.
व्यवहारांत सुध्दां शिक्षण पध्दती अशीच आहे. मुलाला टप्प्या टप्प्यानेच शिकवले जाते. पहिलीचा अभ्यास शिकल्यावर विद्यार्थी आपणांस किती प्रमाणात ज्ञान समजले, काय काय उत्तरे येतात, ह्याचा मागोवा गेतो व अभ्यासात सुधारणा करतो. सिध्दांत घोटून घोटून ज्ञान आत्मसात् करतो. वर्षाच्या शेवटी परीक्षा होते. विद्यार्थ्याला कितपत समजले आहे? ते मिळालेल्या गुणांवरून समजते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच पुढील इयत्तेचा अभ्यास सुरू होतो. शिक्षण संपेपर्यंत ही प्रक्रिया दर वर्षी होतेच. परीक्षा दर वर्षी होतेच. ३५टक्के गूण मिळवून परीक्षा उत्तीर्ण होता येते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर, व्यावसायिक शिक्षण, त्यानंतरच प्रत्यक्ष कार्य सुरू होते.
दैवी उन्नतीच्या क्षेत्रांतील परीक्षा जीवनात घडणार्या प्रत्येक प्रसंगा गणिक होत असते, साधकाच्या वागणुकीवरून प्रगतीचे मूल्यमापन केले जाते. ज्ञान मुरून 100टक्के आचरणात उतरणे अपेक्षित असते. प्राविण्य अपेक्षित असते. मूल्यमापनानुसार पुढील ज्ञान सद्गुरू आपणहून उपलब्ध करून देतात. प्रगती टप्प्या टप्प्यानेच होते. शेवटच्या उत्क्रांत उन्नत अवस्थेच्या टप्प्या पर्यंत शिक्षणाची ही प्रक्रिया चालूच रहाते. मानसिकता बदलाची वाट अत्यंत निसरडी आहे. प्रयत्न जागरूकपणे करणे जरूरीचे. ही सगळी सुविधा परब्रह्म परमेश्वर स्वरूप हृदयस्थ सद्गुरूच प्रदान करतात. तेच प्रगतीचे नियंत्रण करतात. ही शिक्षणाची प्रक्रिया म्हणजेच साधना. ज्ञान आत्मसात् करणे तसेच ज्ञानाचा रोजच्या जीवनात वापर करणे. दोन्ही प्रक्रिया सोबतच कराव्या लागतात. थिअरी आणि प्रॅक्टीस दोन्ही बरोबरच करायचे असतात. नुसती थिअरी उपयोगाची नसते. दोन्हीचा समन्वय साधता येणे अत्यावष्यक आहे. तरच जीवन सुगम होईल.
आणखी बरेच मूलभूत प्राथमिक विचार मांडायचे आहेत. परंतु टप्प्या टप्प्याने पुढे जाऊ. अजीर्ण नको.