!!श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ!!
प्रत्येकाला आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचेच असते. त्यासाठी यशप्राप्तीची सुस्पष्ट व्याख्या करणे आलेच. ध्येय निश्चित करणे ही प्रयत्नांची सुरुवात. सुरुवात अतिशय महत्वाची. सुरुवात सुयोग्य स्थानापासून झाल्यास यशाची शक्यता बळावतेच. आपल्याला कुठे जायचं आहे? काय मिळवायचं आहे? ते ठरल्यावरच दिशा ठरेल. सुयोग्य स्थानापासून सुयोग्य दिशेने प्रयत्न होणे गरजेचे. तरच यशाची शक्यता बळावणार. अन्यथा उलट सुलट दिशाहीन प्रयत्न होऊन मनुष्य घुटमळणारच. परिश्रमाला संपूर्ण यश येण्याची खात्री नाहीच. कारण यश म्हणजे काय मिळवायचं? हेच निश्चित नाही.
ध्येय काय असावे? कसे ठरवावे? ध्येय सर्वांत उंच पाहिजे. लो एम इज क्राईम. विचार करा. कल्पनाशक्तीला ताण द्या. उच्चतम ध्येय काय असू शकेल? काय ठरवता येईल? त्यासंबंधी जाणकार, ज्ञानी लोकांच्या कडून माहिती मिळवा. शोधाशोध करा. स्वत: शोधल्यावर सापडेलच.
आता अध्यात्मशास्त्रावर आधारित विचार चिंतनार्थ मांडतो.
सध्याच्या दिवसांत बहुतेक सर्व जणांचा जीवन-उद्देश, धनसंचय, सोयी सुविधांचा संग्रह, विविध भोग सामुग्रीचा संग्रह, प्रसिध्दी मिळवणे, सत्ता मिळवणे व टिकवून ठेवणे, आणि ऐश आरामात चिंतामुक्त जीवन जगणे. एवढ्यावरच थांबतो. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. त्या पलिकडे मिळवण्यासारखं काही असेल याचा विचारच नाही.
जीवन फक्त धनसंचय तसेच भोग भोगण्यापुरतंच सीमित नाही. भोग भोगताना त्यापासून आनंद मिळवणे हाच मुख्य उद्देश असतो. आनंदासाठीच भोग हवे हवेसे वाटतात. सुख हंव हंवस वाटतं. प्रशंसा परोक्ष किंवा अपरोक्ष कानावर आली की कसं कुरवाळल्या सारखं वाटतं. गोंजारल्यासारखं वाटतं. आनंद मिळतोच. मनुष्य जीवन जगताना दैनंदिन व्यवहारासोबत नकळत सुखप्राप्तीचे, म्हणजे पर्यायाने आनंद प्राप्तीचे, प्रयत्न करीतच असतो. सुख भोग भोगताना आनंद प्राप्त होतो. एवढा एकच रस्ता माहीत आहे. असंख्य पिढ्या मनुष्याची तीच वहिवाट आहे. शोधल्यास अनेक मार्ग मिळतील. परंतु वहिवाटीचा रस्ताच बरा, असा विचार करून मनुष्य राजरस्ताच स्विकारतो. (Known devil is better than unknown Angel.). भोगप्राप्तीसाठी आयुष्यभर प्रयत्न करतो. भोग केवळ प्रस्तुत जन्मापुरतेच नव्हे मृत्यू पश्चात् स्वर्गप्राप्ती द्वारे दिव्य भोग भोगायला मिळण्यासाठी पण प्रयत्न असतात. विचार स्वर्गप्राप्ती या संकल्पने पेक्षां उंच झेपावत नाहीत. तसेच झेपत नाहीत. भिती वाटते.
अध्यात्मशास्त्रानुसार परमेश्वरप्राप्ती, भगवप्राप्ती, हेच उच्चतम ध्येय ठरवावे अशी शिफारस केली आहे.
परमेश्वराचे अस्तित्व आहे किंवा नाही? येथ पासूनच संभ्रम आहे. परमेश्वरप्राप्ती हा केवळ कल्पनाविलासच वाटतो. हे खरं असू शकेल यावर विश्वास ठेवलाच जात नाही. बुध्दीच्या जोरावर पटत नसेल. परंतु समस्याग्रस्त मनुष्य मानसिक आधारासाठी, तसेच सर्व भौतिक प्रयत्न करून थकल्यावर शेवटी मदतीसाठी, परमेश्वराकडेच धाव घेतो. त्यावेळेस भावनेला महत्व देऊन परमेश्वराचे अस्तित्व मान्य केले जाते. तेव्हां अशा उलट सुलट विचारांच्या संभ्रमात अडकून पडू नका. परमेश्वरप्राप्ती हे वास्तवच आहे. कल्पनाविलास नव्हे. असंख्य संत सत्पुरुषांनी या अवस्थेचा अनुभव घेतलेला आहे. अनुभव घेत घेत स्वत:चे ऊर्वरित जीवन व्यतित केले आहे.
परमेश्वरप्राप्ती हे ध्येय निश्चित करा. ते स्वप्न सत्यात उतरवण्याचे अटोकाट प्रयत्न करा. त्यानुसार मानसिकता बदला, विचारसरणी बदला. मग जीवनात कसा आनंद फुलतो त्याचा स्वत: अनुभव घ्या. जीवन आनंदाचा आस्वाद घेत जगायचं असतं. रडत खडत जीवनाचा गाडा ओढायचा नसतो.
परमेश्वरप्राप्ती हे एक आकर्षक पॅकेज आहे. त्यामधे काय काय येतं ते बघूया.
1. अखंड आनंद. उकळ्या फुटत ओसंडून जाणारा आनंद.
2. अखंड तृप्ती. बदलत्या परिस्थितीत देखील सदैव तृप्त अवस्था.
3. अखंड समाधान. परिस्थितीत बदलता देखील हंव हंवं, नको नको ची वखवख नाही.
4. जगणं फक्त वर्तमान काळातच. भूकाळाचा ताप नाही. भविष्याची चिंता नाही. घाबरायचं कारणच नाही. परिणाम स्वरूप भय आणि चिंता गायबच.
5. सर्वप्रकारच्या बंधनातून मुक्त अवस्था.
6. संपूर्ण मोकळं विश्वाचं ज्ञानभांडार. कुठल्याही विषयाचं ज्ञान केव्हांही उपलब्ध. इच्चा असेल तेवढं लुटा. अमर्याद लुटा.
7. शिवाय सोबत स्वत:च्या तसेच परमेश्वराच्या विश्वव्यापक स्वरूपाची अनुभूती.
मनुष्य ज्याच्या करता जीवाचा आटापीटा करतो. ते संगंळंच एका पॅकेज मधे. आणखी कांही मिळवण्यासारखं रहातच नाही.
गाजर जबरदस्त आहे. आकर्षक आहे. पण मिळवणे कठीणच आहे. यश सहजा सहजी आयतं मिळण्यात मजाच नाही. ध्येयावरील लक्ष विचलित झाल्यास दिशाभूल होईल. वाट चुकून भरकटायला होईल. दिशाभूल करायला प्रलोभने, व्यत्यय, वैचारिक विक्षेप, इत्यादी टपलेले असतातच. सदैव सावध राहिले पाहिजे. प्रयत्न मनाच्या सूक्ष्म पातळीवर करायचे आहेत. ध्येय नेहमी दृष्टिपथात, आठवणीने लक्षांत ठेवले पाहिजे.
एवढ्या उच्चतम ध्येया पर्यंत आपली मजल जाईल का? असंख्य अडथळे येतील. आपली दमछाक तर होणार नाही ना? असे नकारात्मक विचार घोळवू नका. मी साध्य करणारच. दमछाक होत असेल तर टप्प्या टप्प्याने थांबत थांबत जाईन. पण जाईनच. अडथले आलेच तर त्यावेळेस बघू. कांहीतरी मार्ग आयत्यावेळेस सापडेलच. असा सकारात्मक निश्चय करा. म्हणजे नेटाने प्रयत्न घडतील व शेवटी यशप्राप्ती होईल. यश प्राप्तीची वाट खडतरच असते. निसरडीच असते.
प्रस्तुत जन्मात साध्य झालंच तर चांगलंच आहे. अन्यथा निदान प्रगतीला सुयोग्य दिशा तर मिळेल. दिशाहीन भरकटणार तर नाही. योग्य दिशेने प्रयत्न केल्यावर थोडी तरी प्रगती होईलच. पुढचे जन्म हाताशी आहेतच. ईश्वरी सहाय्य वेळोवेळी मिळतेच. मग मागे कशाला फिरायचं? असे सकारात्मक विचार ठेवा.
मनुष्यदेह परमेश्वरप्राप्ती साध्य करण्याच्या उद्देशानेच निर्माण केलेला आहे. त्यासाठी जरूर असलेल्या सर्व क्षमता मनुष्यदेहांत उपलब्ध आहेत. परमेश्वरानेच प्रदान केलेल्या आहेत. ह्या क्षमता फक्त मनुष्यदेहातच उपलब्ध आहेत. मनुष्यजन्मातच परमेश्वरप्राप्ती साधता येते. स्वर्गात रहाणाऱया देव देवतांना परमेश्वरप्राप्तीसाठी मनुष्यजन्म घ्यावाच लागतो. तुम्हाला मिळालेल्या दुर्लभ संधीचा पुरेपूर फायदा घ्या.
विचारपूर्वक नियोजनपूर्वक प्रयत्न करा. निसरड्या जागा, खाचखळगे यांच्याबद्दल व्यवस्थित ज्ञान सतत मिळवून वेळोवेळी प्रयत्नांचं नियोजन करणं महत्वाचं आहे. दूरगामी नियोजन तसेच वेळोवेळी नियंत्रण जरुरीचे. पल्ला लांबचा आहे. वेळ आणि शक्ती पुरवून पुरवून काटकसरीने वापरली पाहिजे.
निराश कदापि होऊ नका. मनुष्य चुका करणारच. चुका सुधारत, शिकत शिकत पुढे जायचे आहे. सर्वतोपरीने परमेश्वरी सहाय्य, संरक्षण, सदैव आहेच या बद्दल खात्री बाळगा.
असंख्य ज्ञानविचार एक एक करून आपल्यासमोर मांडायचे आहेत. एकदम नको. पुढील लेखांत वाचा. आपणास सुयश मिळावे म्हणून श्री स्वामी समर्थ चरणीं प्रार्थना करून येथेच थांबतो.