प्रसंगाध्ययन क्र.6

!! श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ !!

प्रसंगाध्ययन क्र. 6

जिज्ञासा

लग्न होऊन सासरी आलेल्या तरूण गृहिणीने पत्राद्वारे कांही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी मांडलेल्या पहिल्या प्रश्नावर विचार करूया.

ध्यानाच्या प्रक्रिये संबंधातील त्यांची समजूत त्यांनी मांडली आहे. तसेच त्यांना त्यांबंधी आणखी माहिती  पाहिजे.

1.    लग्नापूर्वी मी नियमीतपणे ध्यानाभ्यास करीत होते. परमेश्वराला पूर्णपणे शरण जाऊ शकत होते. लग्नानंतर घर व नोकरी अशी कसरत रोज करणे, हेच मोठे आव्हान आहे. ते आव्हान पेलताना, ध्यानासाठी लागणारी शांतता मला नियमीतपणे मिळू शकत नाही. वरचेवर व्यत्यय येत असल्या कारणाने परमेश्वराला शरण जाणे कठीण जाते.

2.    शरण जाण्याविषयीं मला समजलेली माहिती सांगते. योग्य माहिती मिळाल्यास माझी चूक माझ्या लक्षांत येईल. संपूर्ण शरणागत अवस्थेत परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेऊन जीवनात काय घडणार या बाबत आपण निश्चिंत होतो. आपण आपले नित्याचे व्यवहार करताना “परमेश्वर आपल्या सोबत आहेच आणि तो आपल्याला सांभळून घेईल. आपल्याकडून चूक होऊ देणार नाही. आपल्या उन्नतीसाठी योग्य असेल तेच घडेल. त्याच प्रमाणे प्रारब्धानुसारच घटना घडतील. ईश्वरावरच्या श्रद्धेमुळे वाईटाची तीव्रता कमी होईल. थोडक्यात, आपली काळजी घेणारं कोणीतरी आहे आणि तो आपल्याला निश्चित सांभाळून घेईल. प्रारब्धानुसारच घटना घडतील.  आपल्या अपेक्षे प्रमाणे घडेलच असे नाही. परंतु घडेल ते आपल्या हिताचेच  असेल. ” अशी ठाम समजूत ठेवायची.

विश्लेषण

          कृपया लक्षांत ठेवा कीं ध्यान हे एक साधन आहे. स्वत:च स्वत:च्या आचरणामधे सुधारणाकरण्यासाठी विकसित केलेल्या साधनांपैकी एक साधन आहे. ध्यान ह्या साधनाचे प्रयोजन, मुख्यत्वेकरून स्वत:च्या मनात फिरत असलेल्या विचार धारांचं निरीक्षण करण्याची क्षमता विकसित करणे हे आहे. हे निरीक्षण दिवसाचे 24 तास करण्याची संवय तसेच क्षमता हळू हळू विकसित करायची आहे. आजूबाजूची परिस्थिती कशीही बदलली तरी देखील निरीक्षण प्रक्रिया चालू ठेवण्याची संवय विकसित करायची आहे.

          ह्या अभ्यासामुळे मनुष्य स्वत:च्या अंत:करणांत घोळत असलेल्या विचारमालिकांचे त्रयस्थाच्या भूमिकेतून निरीक्षण करायला शिकतो. ध्यान हा एक मानसिक सराव आहे. शारिरिक नाही. अंत:करणातील सुप्त अवस्थेतील सिध्दी जागृत होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत, ही संवय महत्वपूर्ण भूमिका निभावते.

          ज्ञानावर आधारित आचरण सिध्द करण्यासाठीं मानसिकता अथवा धारणा सुधारणे अत्यंत आवष्यक आहे. मनाला वळण लावण्यासाठीं मनातील प्रस्तुत घडामोडींची इत्थंभूत माहिती असली पाहिजे. मनाच्या गुणधर्मांचे ज्ञान झाले पाहिजे. त्यासाठीं ही निरीक्षणाची संवय अत्यावश्यक. नदीच्या पाण्याच्या प्रवाहा संबंधीचे ज्ञान नदीच्या काठावरूनच मिळवता येते. पाण्यात उतरून नाही. तसेच मनांत चाललेल्या विचार प्रवाहात न अडकतां. प्रवाहाच्या बाहेर येऊन त्रयस्थाच्या भूमिकेतून त्याचे निरीक्षण करावे लागते. त्यावेळेसच प्रवाह बदलण्यासंबंधी अभ्यास करता येतो. प्रवाह कुठल्या दिशेला वळवायचा, कसा वळवायचा? त्याचा अंदाज घेता येतो. नदीच्या पात्राचा आकार कसा बदलता येऊल ते ठरवता येते. बंधारा घालून प्रवाह अडवल्यास जलाशय निर्माण होईल. पण प्रवाहाची दिशा बदलता येणार नाही. मनाचे तसेच आहे विचारप्रवाहांना आडकाठी केल्यास दबाव वाढतच जातो व अडथळा मोडून प्रवाह जास्तच वेगांत धावतो अथवा दबाव सहन न झाल्याने तिसर्‍याच अनपेक्षित मार्गाने वाहू लागतो. मनावर जुलूम जबरदस्ती चालत नाही. दबाव सहनशीलतेच्या मर्यादेबाहेर वाढल्यास नकोत्यापध्दतीने विचारांचा विस्फोट होऊन पूर्णत: अनपेक्षितपणे मनुष्य वागतो. अथवा, दबावाचे परिवर्तन शारिरिक व्याधी मधे होऊन, त्यावाटे दबाव कमी करण्याचा प्रयत्न होतो. मनाला त्याच्या कलानेच वळण लावणे श्रेयस्कर. ह्या सगळ्या अभ्यासा करितां ध्यान साधना मदतीस येते. निरीक्षणाचे तंत्र कामास येते. निरीक्षणाद्वारे दबाव निर्माण करणारे संदर्भहीन अगंतुक विचार विस्मृतीत ढकलून दबाव मर्यादेत ठेवता येतो. त्यानंतर ज्ञानविचारांचे मजबूत अडथळे किनार्‍यावर निर्माण करून प्रवाहाची दिशा हळू हळू वळवता येते. ह्या सगळ्या प्रक्रियेतील निरीक्षण क्षमतेचे महत्व लक्षांत आलेच असेलच.

         मानसिकता बदलून आचरणातील ज्ञानविचारांचा वापर वाढवता येतो. आचरण सुधारते. अविचारी कृती टाळली जाते. त्यामुळे इतरांबरोबरचे संबंध सुधारून सहीष्णू, मदतकरणारे, आपले आपलेसे वाटणारे प्रसन्न व्यक्तिमत्व प्रस्थापित होते.

          सातत्याने ज्ञानाधिष्ठित आचरण हा अध्यात्मिक उन्नतीचा पाया आहे. पाया मजबूत नसेल तर वरचा डोलारा एखादी छोटीशी समस्या आल्यास कोसळू शकतो. जाणीव पूर्वक पाया मजबूत करणे अत्यावष्यक. सातत्याने ज्ञानाधिष्ठित आचरण सिध्द करण्याच्या प्रक्रिये दरम्यान ज्ञानविचारांचा पाठपुरावा करताना वाटेत येणारे असंख्य शारिरिक तसेच मानसिक अडथळे, व्यत्यय, विक्षेप, पार करावे लागतात. निश्चय तसेच धैर्याचा कस लागतो. ज्ञान सिद्धांतांचा अभ्यास तसेच प्रत्यक्ष अनुभव असा दुहेरी सराव असतो. अंमलबजावणीच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे मजबूत पाया विकसित होतो. समस्यांवर मात करण्याचा प्रचंड अनुभव गाठीशी असल्याने मनुष्य धैर्याने प्राप्त परिस्थितीचा सामना करतो. ह्या सगळ्या प्रक्रियेत, मनाला वळण लावत समजावण्याची उत्तम संवय लागते. अध्यात्मिक ऊन्नतीचा पुढील प्रवास अनुभवांच्या शिदोरी मुळे सहज सुलभ होतो.

          आपल्याला व्यत्यय रहित शांत वेळ मिळाल्यासच आपण ध्यानाभ्यास करूं शकतो असा समज करून घेऊ नका. धकाधकीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे असा वेळ रोज मिळणे असंभव. निरीक्षण दिवसाचे 24 तास करण्याची क्षमता विकसित करायची आहे हे लक्षांत ठेवा. तेव्हां व्यत्यय हा येणारच हे गृहित धरा. व्यत्यय ही पीडा समजू नका. व्यत्यय ही सरावाची संधी समजा. शक्यतो कमित कमी व्यत्यय येईल अशी, तुम्ही नियमीत पाळू शकाल अशी, तुमच्या सोयीची वेळ निवडा. नियमितपणा तसेच  मानसिक सराव करणे दोन्ही महत्वाचे. कांही अपरिहार्य कारणांमुळे जर एक दोन दिवस ध्यानाभ्यासात खंड पडलाच, तर अस्वस्थ वाटून घेऊ नका. हुरहुर नको. त्यानंतर लगेच परत सुरुवात करा.

          सहजासनांत सर्व अवयव स्थिर ठेवा. पद्मासन घातलेच पाहिजे असे नाही. मांडी घलून बसणे अगत्याचे नाही. मांडी घालून बसता येत नसेल तर स्टुलावर अथावा बिन हातांच्या खुर्चीवर बसा. कांही हरकत नाही. फक्त पाठीचा कणा ताठ ठेवा. पाठ न टेकवता बसा.ह्या अवस्थेत  सर्व स्नायू शिथील करा. डोळे हलके बंद करा. दिसणे बंद होईल. घट्ट बंद करू नका. पापण्यांवर ताण नको. त्यानंतर एकएक करून सर्व ज्ञानेन्द्रियांकडून येणार्‍या संदेशांकडे पूर्ण दुर्लक्ष करा. तसा प्रयत्न नेटाने लक्षपूर्वक करा. शरीरा कडील लक्ष बंद झाल्यावर तुम्हाला ध्यानाकरिता जरूर असलेली शांती निश्चित प्राप्त होईल. त्यानंतर मनाकडे लक्ष देणे शक्य होईल. एखादा व्यत्यय जर आलाच, तर त्याला पीडा समजू नका. सरावाची संधी समजा. चिडू नका. क्रोध टाळा; कुणाला दोष देऊ नका; मानसिक संतुलन ठेवा. व्यत्यया बद्दलचा एखादा सूक्ष्म विचार देखील मनांत असंख्य नवीन विचारमालिका निर्माण करेल. अत्यंत खोलवर रुतणारी सल निर्माण करेल. त्या नवीन विचार मालिका मानतील विचाराचा गुंता आणखीन वाढवतील. त्रास होईल. सावध रहा. व्यत्यय सोडवल्यावर परत सुरुवात करा. सरते शेवटीं तुम्हाला 24तास निरीक्षणाची संवय विकसित करायची आहे. हे विसरू नका. दिवसभरांत व्यत्यय येणारच. व्यत्यय शांत चित्ताने प्रेमळ वर्तणूक ठेऊन हाताळा. ऐकदा घरातल्या व्यक्तींना तुमच्या नियमीत ध्यानाभ्याबद्दल माहीत झाले कीं. हळू हळू तुम्हाला त्यावेळांत कोणी त्रास देणार नाही. कदाचित ही विचारसरणी निर्माण होणार देखील नाही. परंतु चिडू नका. तोच राग तुमच्यावर उलटेल व त्रास होईल. तेव्हां सावध रहा. ह्या निरीक्षणाच्यासंवयीची परिणती. सहजअवस्थेत होते. स्थूल देह त्याचं कार्य करीत राहील. पण मनात चलबिचल नसेल. मन स्थिर असेल. अंत:करण समसमान साम्यस्थितीत असेल. ह्यालाच सहजअवस्था अथवा सहजसमाधी म्हणतात. इंग्रजीत ह्यालाच डायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणतात.

          पूर्वाश्रमीं शिकल्याप्रमाणे ध्यानाभ्यास करण्याची आपल्याला संवय आहे. त्याच प्रकारे सराव चालू ठेवा. आत्ता कांही बदल करू नका. ध्यानाभ्यासा नंतर, मानसिक दडपण कमी झाल्याची संवेदना, प्राप्त झाल्यास आपण योग्य मार्गावर आहांत असे समजावे.

शरणभाव

          मनुष्य समजतो की शरीराने केलेली प्रत्येक कृती त्यानेच केलेली आहे. तशी त्याची ठाम समजूत असते. त्यामुळे मी केले  असे ठरवत कृतीची संपूर्ण जबाबदारी तो स्वीकारतो. आपण वेळोवेळी बदलणारी परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळू शकतो व प्रत्येक वेळेस विचारपूर्वक योग्य कृती करू शकतो याची त्याला खात्री असते. परंतु कांही जटिल समस्या हाताळताना, कांही तरी अनपेक्षित घडते. त्यामुळे मनुष्याच्या आत्मविश्वासाला ठेच लागते. आत्मविश्वास डळमळीत होतो. त्यावर विचार करताना त्याला स्वत:च्या क्षमतेच्या मर्यादा समजतात. त्याच बरोबर थोडीशी ईश्वरी मदत मिळाल्यास आपण परिस्थितीवर नक्की मात करू शकू, असा विश्वास निर्माण होतो. त्याप्रमाणे मनुष्य परमेश्वराच्या मदतीसाठी प्रार्थना करतो. ह्याला मतलबी शरणभाव म्हणतात.

          ह्या मतलबी शरणभावाच्या अवस्थेत सामान्यत: ईश्वरी मदत प्राप्त होत नाही. अहंकारच्या स्पर्शाने विनंती परमेश्वरापर्यंत पोहोचतच नाही. अजून मदत मिळाली नाही ह्याची जाणीव झाल्यावर , स्वत:चा अहंकार बाजूला ठेऊन ईश्वराला परिस्थिती हाताळण्या संबंधीचे सर्व निर्णय अधिकार अर्पण करतो. ईश्वरठरवेल ते आपल्यासाठी चांगलंच असेल असे म्हणत पुढील  घटना ईश्वराची इच्छा म्हणून आनंदाने स्वीकारतो. येथे अहंकाराचा स्पर्श नसतो. ह्या अवस्थेत  संपूर्ण शरणभाव निर्माण होण्यास सुरुवात होते.

          संपूर्ण शरणभाव निर्माण होण्यास सुरुवात झाल्यावर मनुष्य आपोआप मनांत उद्भवणार्‍या प्रेरणांप्रमाणे कृती करतो. परिणामांचा विचार करत नाही. प्रारब्धानुसार परिणाम प्राप्त होतो. प्राप्त परिणाम, मनुष्याच्या अपक्षेनुरूप असला अथवा नसला तरी ईश्वरेच्छा समजून मनुष्य आनंदाने स्वीकारतो. परिणामी आनंदीच रहातो.

          मनुष्याला असे अनुभव आयुष्यात बर्‍याच वेळा येतात. सामान्य माणूस आपल्याला देवाने वाचवले ह्याचाच अभिमान धरून अहंकाराची वृध्दी करतो. तसेच देवाचे उपकार आठवत वेगवेगळ्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.  परंतु भक्त, या अनुभवावरून असा निष्कर्ष काढतो, की देव माझ्यापेक्षा चांगल्याप्रमारे परस्थिती हाताळतो. तेव्हां जीवनातील सर्वच प्रसंग देवालाच  हाताळायला सांगावेत  व स्वत: सर्वदा आनंदी रहावे हेच चांगले. त्या निष्कर्षानुसार निर्णय घेऊन तो स्वत:चे संपूर्ण जीवन ईश्वरावर विसंबून, स्वत: मानसिक पातळीवर संपूर्ण उपलब्ध वेळ परमेश्वरप्राप्तीचे जोरदार प्रयत्न नेटाने करतेा. शरीर यंत्रवत् ईश्वरी अंत:प्रेरणेनुसार कार्य करते. अंतर्यामी मन ईश्वराच्या अनुसंधानात आनंदात मग्न रहाते. जीवनाचा पट प्रारब्ध प्रवाहानुसार उलगडतो. भक्त ईश्वराची इच्छा समजून प्रत्येक घटना आनंदाने स्विकारतो. ह्यालाच संपूर्ण शरणभाव म्हणतात.

          प्रत्यक्ष जीवन घटनाक्रम प्रारब्धाच्या स्वरूपांत जन्माआधीच ठरलेल्या नाट्यसंहितेप्रमाणे उलगडतो. भक्ताची मानसिकता, तसेच त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेला असतो. बदल फक्त मानसिकतेत आहे.

          अध्यात्म शास्त्र नियोजनपूर्वक नियंत्रणा खाली, झेपेल अशा सहज गतीने मानसिकता बदल विकसित करण्यास सहाय्यभूत होते. ताबडतोबीने अतिवेगप्रवेगाने मानसिकता बदलण्याचे प्रयत्न झाल्यास ते मनुष्यास झेपत नाही. मानसिक संतुलन बिघडण्याचा फार मोठा धोका असतो. तो प्रकार अध्यात्म सिध्दांतांच्या जोरावर टाळला जातो. ह्या प्रक्रियेस वेळ लागत असल्याने, दीर्घकाळ दृढ निश्चय टिकणे तसेच धीर धरून नेटाने प्रयत्नशील रहाणे जरुरीचे असते.

          मनुष्याची खरी ओळख शरीर यंत्रणेचा नियंत्रक जीवात्माच आहे. त्याचा वास शरीरांत केन्द्रीय नियंत्रण कक्षांत असतो. केन्द्रीय नियंत्रण कक्षाला हृदयआकाश म्हणतात. त्याच स्थानावर परब्रह्म परमेश्वराचा स्वतंत्र निवास असतो. ह्या परह्मपरमेश्वराच्या अस्तित्वाला सद् गुरूतत्व म्हणतात. जीवात्म्याला, म्हणजे तुम्हाला शेजारील परमेश्वराच्या वासाबद्दल जरा सुध्दा जाणीव नसते. त्यामुळे तो परमेश्वराला बाहेरच सर्वत्र शोधत असतो.

          संपूर्ण शरणागत अवस्थेत स्वत:चे देह यंत्रणा नियंत्रणाचे अधिकार सद् गुरूतत्वाच्या हवाली करणे ही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावरील अत्यंत महत्वाची युक्ती आहे. ह्याला सर्व समर्पण म्हणतात.तुमच्याकडून सर्वाधिकार प्राप्त झाल्यावरच सद् गुरू तुमच्या अंत:करणावर काम करू शकतात. तुमच्या कारणदेहावरील नोंदींमधे बदल घडवू शकतात. कारणदेहावरील नोंदी सुधारण्याची क्षमता, मनुष्याची नाही. ती क्षमता केवळ सद् गुरूंचीच आहे. भक्ताकडून देहयंत्रणा नियंत्रणाचे अधिकार मिळाल्यावरच, सद् गुरू भक्ताचा शिष्य म्हणून स्वीकार करतात. त्याच क्षणीं शिष्याच्या परमेश्वर प्राप्तीपर्यंतच्या संपूर्ण प्रगतीची जबाबदारी स्वीकारतात. अनंत जन्मांचा कालावधी लागला तरी ही शिष्याच्या संपूर्ण प्रगतीचे नियंत्रण तसेच नियमन सद् गुरू स्वत: करतात.  त्यानंतर भक्त स्वत:चे नियंत्रण अधिकार उर्वरित आयुष्यात केव्हांच वापरत नाही. संपूर्ण शरणभाव हा त्याचा स्थायी भाव बनतो.

          संत तुकाराम महाराजांनी खालील अभंगात ह्याअवस्थेचे अप्रतीम स्पष्टीकरण केले आहे.

हेचि थोर भक्ती आवडते देवा। संकल्पावी माया संसाराची।
ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्तिं असो द्यावे समाधान।
वाहिला उद्वेग दु:खचि केवळ। भोगणेते फळ संचिताचे।
तुका म्हणे घालू तयावरी भार। वाहू हा संसार देवा पायीं।।

          लक्षांत ठेवा. संपूर्ण शरणभाव विकसित होऊन, सद् गुरूंनी शिष्य म्हणून स्वीकार करणे हा परमेश्वर प्राप्तीच्या मार्गातील अतिशय महत्वाचा टप्पा आहे. तो टप्पा पार केल्याखेरीज पुढील प्रगती असंभव.

          जीवनातील प्रत्येक घटना, जशी असेल तशी, ईश्वराची इच्छा समजून आनंदाने स्वीकारा. तसेच प्रत्येक वेळेस प्राप्त परिस्थितीला धैर्याने तोंड द्या. अंत:प्रेरणेद्वारे मिळणार्‍या ईश्वरी संदेशाप्रमाणे कृती करा. आनंदाने स्वीकार केल्यास मन:शांती ढळत नाही. शरणागत अवस्थेमधे तुम्ही काय अर्पण करता? आसक्ती मुळे उद्भव होणार्‍या दु:खद भावना, आणि निराशा. तुमच्याकडे शिल्लक काय रहाते? तर निखळ आनंद. आनंद मिळवणं एवढं सोप्पं आहे. तुकाराम महाराज भगवंताच्या हवाली जीवनाची सूत्रे अर्पण करून स्वत: मुक्त व आनंदी झाले. सद् गुरूंना संपूर्ण शरण गेल्यावर भक्ताला विविध जीवन प्रसंगांतील नफा अथवा तोटा याची पर्वा नसते. परिणामांची पर्वा नसते. तो निव्वळ त्रयस्थ निरीक्षक असतो.हा समस्येपासून स्वत:ची सुटका करून घेण्याचा सोप्पा रस्ता आहे. परंतु सिध्द करण्यास अत्यंत कठीण आहे. स्वत:चं महत्व सोडायचं हा विचारच सैरभैर करणारा आहे. अहंकाराला, मीपणाला जबर्दस्त धक्का देणारा विचार आहे. ईश्वरावर ठाम विश्वास; दृढनिश्चय दीर्घकाळ टिकणे; तसेच धिर धरून नेटाने प्रयत्न करणे हे गूण विकसित करणेच कर्मकठीण. शिवाय धैर्य पाहिजेच. अपयशाने निराश न होता, नेटाने प्रयत्न करीत रहिल्यास, जरूर असलेली क्षमता तसेच ऊर्जा सद् गुरू कनवाळूपणे आपणहून प्रदान करतात. स्वामींना असा अखंड प्रयत्न करणारा भक्त मनापासून आवडतो. तो भक्त त्यांचा लाडका होतो. स्वामी त्याचे सर्व प्रकारे लाड करतात.

          आपणास शरणभाव हा सिध्दांत व त्याचे महत्व आत्तापर्यंत नीट समजले असेल अशी आशा करतो. जो भाग समजला नसेल त्याबद्दल खुशाल स्पष्टीकरण मागा. संकोच करू नका.

          परमेश्वरप्राप्तीचे प्रयत्न नेटाने करण्याचा निर्णय घेतलेल्या सर्व जणांना, जरूर असलेली इच्छाशक्ती, तसेच दृढ निश्चया साठी लागणारे बळ आपण आपणहून प्रदान करावे अशी श्री स्वामी समर्थ चरणीं प्रार्थना करतो. तसेच आपणांस सुयश चितितो.

ऐका

किंवा

maxbutton id=”2″ url=”http://swamidnyanprakash.com/wp-content/uploads/2015/06/case-study-6-marathi.pdf” text=”डाउनलोड करा”]

! शुभं भवतु! शुभं भवतु! शुभं भवतु!
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराजकी जय।
Scroll to Top